– खरीप हंगाम पिककर्ज वाटप आढावा
यवतमाळ :- खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने या हंगामासाठी पिककर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांकडून पिककर्ज वाटपाचा आढावा घेतले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये तसेच विविध शासकीय विभाग व बँकांचे अधिकारी राजेश गुर्जर, अशोक चिंचमलातपुरे, योगेश निलखान, अविनाश महाजन, सुरेशचंद्र पाटीदार, प्रतीक कुमार, पवन हेमनानी उपस्थित होते. सुरुवातीस गजभिये यांनी पिक कर्जाचे लक्षांक व साध्य याबाबतची माहिती दिली. जिल्ह्याला यावर्षी २२०० कोटीचे खरीप पिक कर्ज वाटपाचे लक्षांक प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ८६ कोटीचे पिक कर्ज वाटप केले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या बँकेचे कौतूक केले तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक व इंडियन बँक यांनी कर्ज वाटपाची चांगली सुरुवात केल्याबाबत समाधान व्यक्त केले. बँकांनी खरीप पिक वाटप लक्षांकाचे योग्य नियोजन करून मुदतीत वाटप पूर्ण करावे, असे सांगितले. मागील आर्थिक वर्षात अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्याने पिक कर्ज वाटपात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. यावर्षी सुद्धा सर्व बँकानी पिक कर्ज वाटपात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सूचना केल्या.
७ हजार २५ कोटीचा पतपुरवठा आराखडा या २०२४-२५ या वर्षाचा जिल्ह्याचा ७ हजार २५ कोटींचा पतपुरवठा आराखडा असून या आराखड्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते विमोचन करण्यात आले. या आराखड्यात प्राथमिक क्षेत्राकरीता ५५२५ कोटीचा समावेश असून कृषी क्षेत्राकरीता ३६०० कोटी, सुक्ष्म व लघु क्षेत्राकरीता ११६५ कोटी, शैक्षणिक कर्ज ९० कोटी, गृहकर्ज ४०० कोटी व अन्य प्राथमिक क्षेत्राकरीता २७० कोटी तसेच गैर प्राथमिक क्षेत्राकरीता १५०० कोटीचे लक्षांक निर्धारित करण्यात आले आहे.