भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य
खरेदी विक्री, पशुधन बाजार समित्यांमध्ये प्रवेश नाही
नागपूर :- सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन “भारत पशुधन” प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. पशुधनामधील सांसर्गीक रोगांना प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमाद्वारे सर्व पशुधनांचे ईअर टॅगींग करुन या प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक पशुसंर्वधन सहआयुक्त डॉ. सतीश राजु यांनी दिली.
नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील पशुधनास ईअर टॅगींग अनिवार्य राहणार आहे. दिनांक 1 जुन 2024 नंतर ईअर टॅगींग असल्याशिवाय पशुवैद्यकीय संस्था, दवाखाने यांच्यामार्फत पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही. तसेच कत्तलखान्यांमध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी माहिती डॉ. राजु यांनी दिली.
प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गीक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिने सर्व पशुधनाचे ईअर टॅगींग करुन भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पशुधन मालकांनी प्रत्येक जनावरांची माहिती ‘1962 भारत पशुधन’ हा ॲप डाऊनलोड केल्यास नोंदणी संदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुधनाचा मालकी हक्क व हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्वरील उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत पशुपालकांची राहणार आहे.
नुकसान भरपाईसाठी टॅगींग अनिवार्य
नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाची हानी अथवा मृत्यु झाल्यास पशुधनास ईअर टॅगींग असणे आवश्यक आहे. ईअर टॅगींग नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही यासंदर्भात सर्व महसूल, वन, महावितरण आदी विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगींग नसल्याशिवाय करता येणार नाही. तसे कल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार दंडात्म्क कारवाही करण्यात येईल. पर राज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगींग केल्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर आवश्यक करण्यात आली आहे. तपासणी नाक्यावरील पशुसवंर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईअर टॅगींग करुन त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करण्यात यावी. दिनांक 1 जुन 2024 नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगींग शिवाय करता येणार नाही.
पशुधनाच्या विक्रीसाठी बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील विक्री 1 जुन नंतर ईअर टॅगींग शिवाय होणार नाही. त्यासोबत सर्व ग्रामपंचायत महसूल विभाग, गृह विभाग यांनी ईअर टॅगींग शिवाय बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांना सहभागी करता येणार नाही अथवा पशुधन विभागातर्फे परवानगी देण्यात येणार नाही. पशुपालकांनी 1962 भारत पशुधन हा ॲप डाऊनलोड करुन भारत पशुधन प्रणालीवर सर्व प्रकारच्या पशुधनाची तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक पशुसंर्वधन सहआयुक्त डॉ. सतीश राजु यांनी केले आहे.