भंडारा, दि. 4 : महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधारऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’ मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेल्या दर्पण वृत्तपत्राचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.
बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राला पहिले वृत्तपत्र देऊन वैचारिक अभिसरणाची पेरणी केली. त्यांच्यानंतर वृत्तपत्र हे वैचारिक क्रांतीचे महत्त्वाचे साधन बनले. जांभेकर हे एक अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा चांगल्या अवगत होत्या. शिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. भूगोल, विज्ञान, गणित अशा विषयात ते पारंगत होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले ते पहिले भारतीय आहेत. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून काम पाहिले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना 1 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आहे. तसेच उत्कृष्ट पत्रकारिता, तत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहिर करण्यात येते. या स्पर्धेसाठी संबंधित वर्षाच्या माहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येतात.
जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा