संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
–शेती करावी तरी कशी
कामठी ता प्र 19:- इंधन दरवाढी पाठोपाठ खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे.अगोदरच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर खतांच्या दरवाढीचा बोजा वाढला आहे.अनिश्चित पाऊस,मजुरांचे वाढलेले दर, दरवर्षी रासायनिक खतांचे वाढलेले दर यामुळे शेती पीक नफा तोट्याचे म्हणजेच आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे त्यातच पुन्हा एकदा रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
निसर्गाचा लहरीपणा,कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, बदलते हवामान यामुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.याउलट रासायनिक खतांच्या किमती वाढतच असल्याने शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे शेती उत्पादन आणि मालविक्रीचा प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर उभा ठाकला होता अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावा लागले होते .आता बजारपेठा सुरळीत झाल्या असल्या तरी रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत , शेतीची मशागत करून पिकाची व उत्पादनाची वाढ व्हावी यासाठी शेतकरी दिवस -रात्र शेतात राबत असतो तसेच पेरणीच्या वेळी खतांची टंचाई निर्माण होईल या भीतीने बँक, सोसायटी व उसंनवारीने कर्ज घेऊन शेतकरी रासायनिक खतांची खरेदी करतात मात्र यंदा झालेल्या भरमसाठ दरवाढीने शेतीचे उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे.
शेती करताना दरवर्षी खर्चाचा बळ वाढलेला बोजा याउलट उत्पादनाचा नसलेला भरोसा , पीक येईपर्यंत लागणारा खर्च व ऐनवेळी भाव काय राहणार यामुळे शेतकरी राजाला शेती व्यवसाय नकोसा झाला आहे.मात्र पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना शेती पेरावीच लागत असली तरी खतांचे वाढलेले दर , निसर्गाचा लहरीपणा, भावात होत असलेली चढ उतार यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे हे मात्र नक्की..