बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’राबवणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह

– मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

मुंबई :- बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच ‘बालस्नेही पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून हे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी आयोग प्रयत्नशिल आहे. बहुतांश प्रकरणात आरोपी हा पिडीत बालकांच्या ओळखीतला असतो. तक्रार करण्याची भिती, सामाजिक दबाव यामुळे अनेक प्रकरणे दडपली जात असल्याचे निदर्शनात येते. या प्रकरणात तक्रार करण्याचे प्रमाण वाढावे, शाळांमध्ये बाल अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रभावी प्रतिसाद प्रणाली उभारणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क आणि समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे आहे यासाठी आयोग बालरक्षा अभियान राबवित असल्याची माहिती अध्यक्षा शहा यांनी दिली.

या अभियानाचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी ‘बालरक्षा अभियान’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपर पोस्टर्सचे अनावरण, बालकांच्या तक्रार निवारणासाठी विकसित व सुधारित ‘बालस्नेही चिराग ॲप’ लाँच केले जाणार आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,नागपूर, अकोला, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यात शिक्षक, पालक, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी व निवडक विद्यार्थी यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ७,००० जणांना बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्देश बालकांच्या सुरक्षिततेविषयी शिक्षक व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शालेय वातावरण अधिक सुरक्षित बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे, असे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने ‘बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा, संस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय ‘बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेच, बालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, हे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेत, त्याचे विवरण खालील प्रमाणे –

महसूल विभाग: ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी

पोलीस विभाग: जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी

शालेय शिक्षण विभाग: प्रत्येक महसूली विभागातून १ शाळा, अशा ६ शाळांचा गौरव

महिला व बालविकास विभाग: एकूण ९८ अधिकारी व कर्मचारी, तसेच संस्था यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Thu Feb 13 , 2025
मुंबई :- मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि प्रगत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!