नागपूर :- बामसेफ, डीएस-फोर व बसपाचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांचा परिनिर्वाण दिन समारोह कही हम भूल न जाये अंतर्गत काल देशपांडे सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी माजी खासदार डॉ अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रभारी नितीन सिंग तसेच महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी ऍड. सुनील डोंगरे ह्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ऍड संदीप ताजने होते.
मार्गदर्शन करताना डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी ज्या बहुजन समाजाला काँग्रेस व भाजपाने सत्तेपासून व प्रशासना पासून दूर ठेवले त्या बहुजन समाजाला कधी नव्हे एवढी सुवर्ण संधी बहन मायावती ह्यांच्या नेतृत्वात बसपा च्या माध्यमातून शासक बनण्याची चालू झालेली आहे. जो शासक असतो तो देणारा बनतो. आमचा इतिहास हा देणाऱ्यांचा इतिहास आहे. आम्ही सम्राट अशोकाचे वंशज आहोत. बहुजन समाजाने सम्राट अशोका सारखा देणारा बनावे असे त्यांनी आवाहन केले.
ज्यांनी संविधानकर्त्या बाबासाहेबांना नामोहरम केले, मागील साठ वर्षात भारतीय संविधानाला अनेकदा बदलविले अशी काँग्रेस व पूर्णतः संविधान नाकारून मनुवाद प्रस्थापित करू इच्छिणारी भाजप या दोन्ही पक्षापासून सारखे अंतर ठेवून फुले, शाहू, आंबेडकरांना मानणाऱ्या बहुजन समाजाला बसपा व बहणजींच्या माध्यमातून शासक बनण्याची संधी चालून चालून आलेली आहे असेही ते म्हणाले.
देशात करोडोच्या संख्येने असलेल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी बसपा नावाच्या तिसऱ्या शक्तीला साथ द्यावी असे मत युवानेते नितीन सिंग यांनी व्यक्त केले.
विदर्भातील बाबासाहेबांच्या अनुयायांनी जरी निश्चय केला तरी एकट्या विदर्भातून निळ्या झेंड्याचे 20 आमदार जिंकू शकतात असा विश्वास एड संदीप ताजणे यांनी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा प्रभारी ऍड राहुल सोनटक्के यांनी, संचालन जिल्हाध्यक्ष यांनी तर समापन माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केला.
मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नाना देवगडे, नागो जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजना ढोरे, विजय डहाट, राजीव भांगे, सुशील वासनिक, दिलीप मोटघरे, दिनेश गेडाम, हेमलता शंभरकर, प्रदेश मीडियाचे उत्तम शेवडे, जिल्ह्याचे नरेश वासनिक, संदीप मेश्राम, अमित सिंग, प्रताप सूर्यवंशी, अभिलेश वाहाने, प्रिया गोंडाने, सुरेखा डोंगरे, प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांति मीनल व मनोज निकाळजे यांच्या स्फूर्ती व प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला विदर्भातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने आले होते.