भंडारा, दि. 5 : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अधिग्रहीत न केलेल्या मात्र सध्या नुकसान होत असलेल्या जमीनीचे व पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सार्वजनिक व वैयक्तीक मालमत्तांचे नुकसान होत असलेल्या बाबींना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. संदीप कदम बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) अर्चना यादव-पोळ, अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे, शशांक जनबंधु, तहसिलदार निलीमा रंगारी, कार्यकारी अभियंता य. दु.मानवटकर उपस्थित होते.
संचय क्षमता तपासणीसाठी 1 नोव्हेंबरपासून पाणी पातळी वाढविण्यात येत आहे. यामुळे बॅकवॉटरचे पाणी काही भागात शिरले आहे. भुसंपादन न झालेल्या मात्र बॅकवॉटरमुळे बाधित होत असलेल्या शेतपिके व जमीनीचे नुकसान होत असलेल्या पिकांचा सर्वे महसूल यंत्रणेव्दारे करण्यात येईल. 10 जानेवारीपर्यंत पुर्ण संचय पातळी करण्यात येईल. त्यानंतर ड्रोनव्दारे सर्वे करण्यात येईल.