– सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये भीम जयंती कार्यक्रम
नागपूर :- भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वस्तरातील वंचित घटकांच्या त्यांच्यातील कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आकाश मोकळे करून दिले, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत, प्रसिद्ध लेखक प्रा. जावेद कुरेशी (पाशा) यांनी केले.
सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये कर्मचारी वृंदांच्या वतीने शुक्रवारी (ता.२१) केंद्रीय शासकीय कार्यालय (सीजीओ) परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२व्या जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रदीप कुमार दीक्षित होते. प्रमुख अतिथी म्हणून एनएसएसओ, एफओडी चे उपसंचालक जनरल आर.सी. गौतम, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एस. हेडाऊ, भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाचे डॉ. बी.पी. उराडे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. माधुरी बारसागडे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. जावेद कुरेशी (पाशा) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाननिर्मितीच्या कार्यातील अडथळे आणि त्यांचे राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान यावर सर्वस्पर्शी वक्तव्य केले. गांधींजींकडे ‘मला मातृभूमी’ नाही असे उद्वेगाने म्हणाणारे बाबासाहेब संविधानातून देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काची मातृभूमी दिल्याचे ते म्हणाले. १९३२च्या मुंबई येथील दामोधर सभागृहात केवळ दलितांचे नेते असे आरोप झालेल्या बाबासाहेबांनी संविधानात दलितांपूर्वी ३४० वे कलम इतर मागासवर्गीयांसाठी लिहिल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण व्हावे अशी भूमिका मांडणारा पहिला कृषीमंत्री, भाकरा नांगल धरणाच्या माध्यमातून वीज निर्मिती प्रकल्प आणि वीज उत्पादन महामंडळाची निर्मिती करणारा दूरदर्शी नेता, असाही प्रा. जावेश कुरेशी यांनी बाबासाहेबांचा गौरव केला. २ वर्ष ११ महिने १८ दिवसांत संविधान लिहून देशात समानतेचे मूल्य रूजविण्याचे मोलाचे कार्य बाबासाहेबांनी केले हे सांगतानाच त्यांनी फाळणी नंतर पाकीस्तानला संविधान निर्माण करण्यासाठी ११ वर्ष लागल्याकडे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रदीप कुमार दीक्षित यांनी बाबासाहेब हे केवळ २१ शतकातील महापुरूष नसून ते युगपुरूष असल्याचा गौरवोल्लेख केला. एनएसएसओ, एफओडी चे उपसंचालक जनरल आर.सी. गौतम यांनी प्रत्येक नागरिकामध्ये बंधूभावाचा अंगिकार व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. माधुरी बारसागडे यांनी ‘हिंदू कोडिबल’ आणि महिलांचे अधिकार, हक्क याबाबत विवेचन केले.
प्रास्ताविकात भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाचे डॉ. बी.पी. उराडे यांनी जयंतीच्या आयोजनाची भूमिका विषद केली. डॉ. उराडे यांनी बंधूभावाशिवाय स्वातंत्र, समता आणि न्याय या बाबींना पूर्णत्व नसल्याचे नमूद केले. त्यांनी संविधानात बाबासाहेबांनी ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांत देशात एकसंघ केल्याचे नमूद केले. डॉ. उराडे यांनी सीजीओ कॉम्प्लेक्स परिसरात सभागृह, संविधान उद्देशिका म्यूरलचे नूतनीकरण, परिसरात कॅन्टीन आणि सुव्यवस्थित पार्कींग केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रदीप कुमार दीक्षित यांच्याकडे मागणी केली. दीक्षित यांनीही सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शविली.
कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव एनएसएसओ डीपीसी डॉ. अनमोल टेंभुर्णे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप कुमार दीक्षित यांचे स्वागत केले. विनायक मेश्राम यांनी प्रा. जावेद पाशा यांचे तर मंगला गजभिये, सुजाता पाटील, सुमंगला गडपायले, प्रशांत भगत यांनी अन्य मान्यवरांचे सन्मानचिन्ह व रोपटे देऊन स्वागत केले. वीना चव्हाण, सुजाता पाटील, प्रेमशीला पुनवटकर, नेहा चौधरी, निकीता अकार्ते यांनी ‘ज्ञानसूर्य तू इस जगत का’ हे गीत सादर केले. जगदीश राउत यांनी संगीत दिले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एस. हेडाउ यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे अनुवाचन केले.
कार्यक्रमाचे संचालन वीना चव्हाण यांनी केले तर आभार दीपक नागदेवे यांनी मानले. आयोजन समितीचे सचिव एनएसएसओ डीपीसी डॉ. अनमोल टेंभुर्णे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परीश्रम घेतले.
विजेते व मान्यवरांचा सन्मान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. गायन स्पर्धेत विद्यासागर गवळी, गणेश काकडे, दीपक नागदेवे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर मनोज टेंभूर्णे यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोस्टर्स स्पर्धेमध्ये आशा सुटे, सुजाता पाटील, निकीता अकार्ते यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर अथांगण मनोज टेंभुर्णे यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये प्रत्येकी सहा सदस्यांच्या गटांच्या चमूने सहभाग नोंदविला होता. प्रथम क्रमांक गणेश काकडे, अभिषेक कुमार, प्रीति कमल, सुनीता सोरेन, अभिजीत नाखले, दिव्या सावरकर या चमूने तर द्वितीय क्रमांक विनायक मेश्राम, रमन कुमार, दिलीप कुमार, मनीष कुमार, मनमोहन पांडे या एनएसएसओ चमूने आणि तृतीय क्रमांक वर्षा चव्हाण, मंगला गजभिये, सुमंगला गडपायले, सुजाता पाटील, यशस्वीनी, दिपिका पाटील या चमूने पटकाविला.
याशिवाय यावेळी स्पर्धांचे परीक्षक सतीश भगत, जगदीश राऊत, अजय चांदेकर, प्रशांत भगत यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करणारे आयोजन समितीचे अध्यक्ष जीएसटी सहायक आयुक्त संजय थुल, समितीचे सचिव एनएसएसओ डीपीसी डॉ. अनमोल टेंभुर्णे, विनायक मेश्राम, दीपक नागदेवे, उपाध्यक्ष आशा सुटे, प्रेमशिला, मिनाक्षी जांगडे, वीना चव्हाण, सुजाता पाटील, सुमंगला गडपायले, मंगला गजभिये, नीलेश चवरे, रोहित कोवे, शेखर वानखेडे आदींचा सत्कार करण्यात आला.