पर्यावरण पूरक आणि निरोगी समाजासाठी सायकलिंग आवश्यक!- डॉ.अमित समर्थ!
जवाहरलाल नेहरू अँल्युमिनियम संशोधन केंद्रातर्फे आयोजित!
वाडी (प्र.) :केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाडी येथील जवाहरलाल नेहरू अँल्युमिनियम रिसर्च सेंटर तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत वाडी ते कोंढाळी ही ७५ किमी अंतराची सद्भावना सायकल मॅरेथॉन रविवारी पार पडली.सकाळी ६ वाजता जेएनएआरडीडी चे प्रमुख निर्देशक डॉ.अनुपम अग्निहोत्री, विविध पुरस्कारांनी सन्मानित आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ.अमित समर्थ यांनी सायकल मार्चला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. सुमारे १३० महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ सायकलपटूंनी वाडी ते कोंढाळी हे ७५ मीटरचे अंतर सुमारे ३ तासात पूर्ण केले आणि पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परतले.पुरस्कार व प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाला मंचावर उपस्थित
नागपूर शहरातील ७८ वर्षीय प्रसिद्ध सायकलपटू डॉ.अमित समर्थ, सायकल चालक डॉ.भूपेंद्र आर्य, डॉ. सचिन शिरभावीकर, पन्नालाल सेवक यांच्या विशेष सहभागासाठी जेएनएआरडीचे प्रमुख संचालक डॉ.अनुपम अग्निहोत्री, प्रशासकीय अधिकारी आर.श्रीनवासन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून त्यांचा गौरव करण्यात आला.प्रास्ताविकात डॉ.अग्निहोत्री यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतरचा देशाच्या प्रगतीचा इतिहास लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.विभागाकडून सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट भेट देण्यात आली.विशेष म्हणजे ही टी-शर्ट एमआरआय विभागाने टाकाऊ प्लास्टिकवर प्रक्रिया करून निर्मित केली आहे.प्रमुख पाहुणे डॉ.अमित समर्थ म्हणाले की, सध्या पर्यावरणाला पूरक आणि निरोगी समाज घडविण्यासाठी सायकल वापराला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.देशातील सायकल शहर म्हणून नागपूर ओळखीच्या उद्देशाने सर्वांनी सायकलचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुरू करण्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. डॉ.भूपेंद्र आर्या यांनी उत्कृष्ट आयोजनाची स्तुती केली.नंतर सहभागी सर्व सायकल चालकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक ,तसेच अल्युमिनियम केंद्राद्वारे निर्मित मोबाइल स्टँड भेटस्वरूप प्रदान करण्यात आला.संचालन नितीन वऱ्हाडपांडे यांनी केले. के.जे.कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. विभाग कर्मचारी सुहास ठोकळ, विनोद शिरसाऊत, अनिरुद्ध गिजरे आदींनी अथक परिश्रम घेतले.