यवतमाळ :- राज्यात गेल्यावर्षी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी देखील गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन, संवर्धन, राज्यातील गडकिल्ले, राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जन जागरूकता, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपुरक मुर्ती व सजावट, ध्वनीप्रदुषणरहीत वातावरण, पारंपारिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा अशा निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे.
राज्यस्तरावर प्रथम आलेल्या मंडळाला 5 लाख, द्वितीय 2 लाख 50 हजार तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या मंडळाला 1 लाख रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्यास 25 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
सदर स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि.३१ ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करून स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हास्तरीय निवड समितीकडून करण्यात आले आहे. स्पर्धेसंबंधीची अधिक माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.