नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटना, राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित भारतीय पुरुष सॉफ्टबॉल संघासाठी निवड चाचणी स्पर्धेचे शनिवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी यांनी सॉफ्टबॉल खेळून उदघाटन केले.
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमात क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, मंगळवारी झोन समिती सभापती प्रमिला मथरानी, नगरसेविका संगीत गिऱ्हे, उपसंचालक अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव एल. आर. मौर्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण अनावकर, महाराष्ट्र संघटनेचे सचिव डॉ. प्रदिप तळवेलकर, डॉ. सुरजसिंग येवतीकर, श्री. जगताप, डॉ. दर्शना पंडीत, उपायुक्त (क्रीडा) विजय हुमने, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त अभिषेक सेलोकर, उर्वशी सनेश्वर, रवींद्र टोंग, चेतन महाडिक, निकिता राऊत, अल्फीया पठाण, जयंत दुबळे आणि मृणाली पांडे यांचा सत्कार केला. तसेच उदघाटनाप्रसंगी मंगळवारी झोन समिती सभापती प्रमिला मथरानी यांनी सॉफ्टबॉल स्पर्धेत गोलफेक केली तर महापौर दयाशंकर तिवारी यांनी चेंडूवर यशस्वीरीत्या प्रहार केला.
आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या ११० सॉफ्टबॉल खेळाडूंचे नागपूर शहरात आगमन झाले आहे. सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होउन आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडू पुढील दोन दिवस आपल्या कौशल्य व क्षमतांची परीक्षा देणार आहेत.
२३ वर्षाच्या खालील पुरुष आशियाई स्पर्धा सिंगापूरमध्ये होणार असून या स्पर्धेतील पहिले दोन संघ अर्जेंटिनामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तर वरिष्ठ गट पुरुष आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार असून त्यातून पात्र होणारे संघ न्यूझीलंडला नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा खेळतील.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातील खेळाडूंचे नागपूर शहरात स्वागत केले व स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.