मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी
काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याच्या पत्रावर माजी विधानसभा सदस्य,असं लिहिलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याआधीच आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं.
आजच प्रवेश का?
केंद्रीय मंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे. पण राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतील.