कुलर वापरताय? मग, ही काळजी घ्या!

नागपूर :- वाढत्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कुलरचा वापर वाढला आहे. परंतु, कुलर वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे, कुलर वापरताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कुलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना:

अर्थिंगची तपासणी: कुलर जोडण्यापूर्वी घरातील अर्थिंग योग्य आहे का, याची तपासणी अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी. अर्थिंग योग्य नसल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढतो. कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कुलरचे कनेक्शन आणि वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे.

आयएसआय मार्क असलेले कुलर वापरा: बाजारात आयएसआय मार्क नसलेले कुलरही उपलब्ध आहेत. हे कुलर वापरल्यास विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. त्यामुळे, नेहमी आयएसआय मार्क असलेले कुलर वापरावेत.

ईएलसीबी उपकरण बसवा: घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ईएलसीबी) हे उपकरण बसवल्यास विजेचा धक्का लागल्यास वीजपुरवठा त्वरित खंडित होतो आणि जीव वाचू शकतो.

कुलरची नियमित तपासणी: कुलरची वायरिंग योग्य आहे का, कुलरच्या बॉडीला अर्थिंग जोडलेली आहे का, याची नियमित तपासणी करावी. कुलरला स्वतंत्र पॉवर सॉकेटवरच जोडावे. जोडलेल्या वायरने कुलरला वीजपुरवठा देऊ नये. कुलर चालू करण्यापूर्वी पॉवर कॉर्ड आणि प्लग व्यवस्थित असल्याची खात्री करावी.

कुलरमध्ये पाणी भरताना काळजी: कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी स्विच बंद करून प्लग सॉकेटमधून बाहेर काढावा. ओल्या हातांनी कुलरला स्पर्श करू नये. पाणी भरताना ते टाकीच्या बाहेर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. कुलरमधील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा.

विजेचा धक्का लागल्यास काय करावे: कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावावी. कुलर सुरू असताना त्यातून करंट येत असल्याचे लक्षात आल्यास, तो त्वरित बंद करावा. कुलरजवळ कुणाला विजेचा धक्का लागल्यास त्या व्यक्तीला स्पर्श करू नये. कोरड्या लाकडी वस्तूने त्या व्यक्तीला कुलरपासून दूर करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

महावितरणला तत्काळ कळवा: कुलरमुळे इलेक्ट्रीकल अपघात झाल्यास महावितरणच्या 1912/19120/ 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सुरक्षित वापर:

एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडू नयेत.

पावसाळ्यात कुलरचा वापर टाळावा.

कुलरची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करावी.

लहान मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे.

कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल अशी व्यवस्था करावी.

कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी.

कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे.

या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून आपण कुलरमुळे होणारे अपघात टाळू शकतो, असे महावितरणने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आता तो काळ संपला पाण्यावर सर्वाचा अधिकार ! - अभिषेक मिश्रा 

Fri Mar 21 , 2025
नागपूर :- किती विषम परिस्थिती असेल तेव्हा हाडा मांसाचा माणसाला नैसर्गिक पाण्या पासून अलिप्त ठेवण्यात आले होते हि विषमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याला स्पर्श करून समतेचे बिगूल फुंकले तेव्हाच तर आज दलित ब्राम्हण एका सोबत पाण्याचा घोट पित आहे असे मार्मिक भाष्य ब्राह्मण समाजाचे युवा नेते अभिषेक मिश्रा यांनी केले ते महाड चवदार तळे क्रांती दिनानिमित्त आयोजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!