तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

– प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीत निर्णय

– मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची उपस्थिती

मुंबई :- महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थित सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.

‘आपले विचार एक आहेत. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊन खूप काही करू शकतो,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोवा महाराष्ट्राचा लहान बंधू आहे. त्यामुळे गोव्याच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतील, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी खूपच चांगले सहकार्य केले आहे. पाणी या विषयाबरोबरच सर्वच क्षेत्रात यापुढेही असेच सहकार्य लाभेल असा विश्वास आहे. तिलारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल, त्यांनी आभारही मानले. गोव्याचे जलसंपदा मंत्री शिरोडकर यांनीही पाणी वाटपच नव्हे, तर अन्य विषयातही सहकार्य वाढवू असे अपेक्षा व्यक्त केली.

तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३० ते ३५ वर्षापुर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पूनरुज्जीवनाबाबत बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त अशा २२ प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री  सावंत यांनी प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर धरणाचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गोव्यातील अभियंताच्या क्षमता बांधणीसाठी महाराष्ट्राकडून सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी कालवे पुनरूज्जीवन आणि संनियंत्रणाच्या दृष्टीने संयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यावेळी राज्याचे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रकल्पांबाबत विस्तृत सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गोव्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोव्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी,अधिक्षक अभियंता ज्ञानेश्वर सालेकर, कार्यकारी अभियंता मिलिंद गावड आदी उपस्थित होते.

तिलारी प्रकल्प दृष्टीक्षेपात…

या आंतरराज्य प्रकल्पासाठी गोवा राज्य ७६.७० टक्के खर्च उचलते. या प्रकल्पाची २१.९३ टिएमसी इतकी क्षमता आहे. यातून गोवा राज्यासाठी १६.१० टिएमसी आणि उर्वरित ५.८३ टिएमसी महाराष्ट्राला पाणी मिळते. प्रकल्पामुळे गोवा राज्यातील २१ हजार १९७ हेक्टर जमीन सिंचना खाली येते. तर महाराष्ट्रातील ६ हजार ७७६ हेक्टरला सिंचन लाभ होतो. या प्रकल्पातून मुख्यत्वे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रा. सुमित पवार यांची बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याशी प्रत्यक्ष भेट

Sat Jun 17 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुमित पवार व परिषदेच्या शिष्टमंडळांनी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याशी १६जून २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले. संचालकांना दिलेल्या निवेदनात११ वी-१२वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाची ओळख निर्माण करणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करा, अन्यथा तीव्र लढा उभा करू,असा इशारा देण्यात आला. वर्ष २०१९-२० साली लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com