संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
अमरावती/मुंबई,दि.२७ मार्च २०२३ : – राज्याच्या विद्युत क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते व अकोला येथील विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष चंदाराणा यांची म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. १ एप्रिलपासून लागू होईल.
उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सूत्रधारी कंपनीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चंदाराणा यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.
चंदाराणा यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वीज क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मागील २५ वर्षापासून विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाद्वारे वीजदराबाबत होणाऱ्या अनेक सुनावण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आयोगाने त्यांना ग्राहक प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा वीज क्षेत्राचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना अकोला जिल्ह्याचा वर्ष २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देख़ील मिळाला आहे.
अकोला येथील रहिवासी असलेले चंदाराणा यांनी वर्ष १९९५ मध्ये अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सूरू केला. चंदाराणा हे अमरावती विभागातील लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष आहेत.
म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक यापूर्वीच कार्यरत असून याखेरीज चंदाराणा यांचीही स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.