नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सरळसेवा पद भरतीचे आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आवेदन पत्र २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेत सहाय्यक कुलसचिव, फोरमन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अशी शासनमान्य रिक्त शिक्षकेतर पदे (एकूण ८ ) सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक ३ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या जाहिरात क्रमांक रातुमनावि/सा.प्र./११२३ अन्वये पात्र उमेदवारांकडून ६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ मार्च २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उपरोक्त पदांसाठी कमाल वयोमर्यादित खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे अशी दोन वर्षे वाढ करण्यात आली. त्यामुळे वरील पदांसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी दिनांक २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच ‘कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर’ यांच्याकडे अर्ज सादर करावा.