नागपूर :- मागील 2022 पासून आजपर्यंत ज्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही, अशा बार्टी, सारथी व महाज्योती पीएचडी संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आजपासून फुलेवाडा पुणे ते विधान भवन मुंबई असा पायी लॉंगमार्च सुरू करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री अर्थमंत्री व महासंचालक ह्यांना आपल्या मागण्यांचे एक संयुक्त निवेदन देण्यात आलेले आहे. नागपुरात लालदेव नंदेश्वर, उत्तम शेवडे, अंकित राऊत, संदीप शंभरकर, प्रणिता चहांदे, योगिता पाटील, ममता सुखदेवे, दिपाली गजभिये यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांना निवेदन देण्यात आले.
2022 ला बार्टीचे 761 विद्यार्थी फेलोशिपसाठी क्वालिफाईड ठरलेत. सारथी (मराठा) च्या 851 विद्यार्थ्यांना, महाज्योती (ओबीसी) च्या 1236 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली. परंतु बार्टी (अनुसूचित जाती) च्या 761 विद्यार्थ्यांना अजून पर्यंत फेलोशिप मिळालेली नाही. त्यामुळे बार्टी च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात बार्टी कार्यालयापुढे 120 दिवस तसेच मुंबईतील आझाद मैदानावर 60 दिवस उपोषण, धरणे, निदर्शने आदी आंदोलन केले.
परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. या आंदोलनाला सर्वच स्तरावरील संस्था संघटनांनी व सत्ता व विपक्षातील अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा सुद्धा दिला होता.
बार्टीच्या विद्यार्थ्यांना मागील अडीच वर्षापासून फेलोशिप न मिळाल्याने तसेच सारथी व महाजोतीच्या विद्यार्थ्यांना दीड वर्षापासून फेलोशिप न मिळाल्याने आज 24 जून 2024 पासून फुलेवाडा पुणे ते विधान भवन मुंबई पर्यंत पायी लाँगमार्च चे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंदोलनात अडीच हजारावर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाची शासनाने जर दखल घेतली नाही तर राज्याच्या 36 जिल्ह्यात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने चक्काजाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.