ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ :- राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सहाय्य करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातीस ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जेष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात प्रदान करणे हे या योजनेचे ध्येय व उदिष्ट आहे.

या योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. त्यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इत्यादीचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे 3 हजार रुपयाच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येते.

या योजनेंतर्गत ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्ष आणि त्याहून अधिक आहे, त्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि नोंदणीची पावती असणे आवश्यक. आधारकार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभाच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बिपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.

लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असावे, याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरीत झाल्यावर विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील.

आवश्यक कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती नोंदणी वाढविण्याचे आवाहन

Sat Mar 2 , 2024
यवतमाळ :- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना इत्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com