नागपूर :- अमर सेवा मंडळ द्वारा संचालित कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथे दरवर्षी विद्यार्थ्यांकरिता क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दि. 3 ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले. दि. 03.02.2024 रोजी अमर सेवा मंडळाचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक महोत्सव 2024 चे उद्घाटन दिप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तसेच प्राध्यापक डॉ. वासुदेव गुरनूले यावेळी उपस्थित होते.
कमला नेहरू महाविद्यालयात या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार अॅड, अभिजीत वंजारी यांनी नवीन शिक्षण प्रणालीची संक्षिप्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कलागुणांचा व कौशल्याचा विकास करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयात दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे गरजेचे आहे… अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व कौशल्याना प्रदर्शित करण्याची संधी मिळते व या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत होते, असे बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर कमला नेहरू महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा जुन्या व नव्या गितांवर आधारित आर्केस्ट्रा संपन्न झाला. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी हिंदी तसेच मराठी सदाबहार गीत सादर करून संगीतमय वातावरण निर्माण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे संचालन मेघा राऊत यांनी केले तर आभार डॉ. सोनाली येंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.