– केंद्र, राज्य सरकारच्या कामांच्या बळावर महायुती विजयी होणार
– माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा विश्वास
मुंबई :- विधानसभा निवडणूकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून केंद्र आणि राज्य सरकारची अव्वल कामगीरी, पक्ष संघटनेच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दानवे पाटील बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माधवी नाईक, आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आदी उपस्थित होते. या समितीमध्ये केंद्र आणि राज्यातील मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांचा समावेश असून एकूण 20 उपसमित्या नियुक्त करण्यात आल्या असल्याची माहितीही श्री. दानवे पाटील यांनी दिली.
दानवे पाटील म्हणाले की, निवडणूक व्यवस्थापन समितीच्या कामकाजाला सुरुवात शुक्रवारपासून जाहीरनामा समितीच्या बैठकीने होणार आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि आ. श्रीकांत भारतीय हे या समितीचे सहसंयोजक आहेत. विविध समित्यांचे संयोजक पुढीलप्रमाणे – जाहीरनामा – वन, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क- राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र – खा. अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महायुती निवडणूक अभियान समन्वय- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रचार यंत्रणेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – आ. प्रवीण दरेकर, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, सोशल मिडिया आय. टी – आ. निरंजन डावखरे, प्रसार माध्यमे संपर्क -आ. अतुल भातखळकर, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – आ. प्रसाद लाड. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रवासाच्या नियोजनासाठी आ. श्रीकांत भारतीय आणि निवडणूक आयोग संपर्कासाठी प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आहेत.
मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या कामाच्या बळावर जनतेचा विश्वास संपादित करत तिस-यांदा केंद्रात सत्ता मिळवली आहे. आता विधानसभा निवडणूकीमध्येही डबल इंजीन सरकारच्या प्रभावी कामगीरीमुळे राज्यात महायुती सरकार येणार असा विश्वास दानवे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.