अमरावती – ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाटयप्रयोग सोमवार दि. 10 एप्रिल, 2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात संपन्न झाला. अपूर्वा सोनार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूपर्यंतची सावित्रीबाई फुले अगदी हुबेहुब साकारली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराचा प्रसंग साकारतांना अख्ख डॉ. के.जी. देशमुख सभागृह स्तब्ध झालं होतं. सभागृहात सूई पडावी आणि त्याचा आवाज यावा एवढी स्तब्धता सभागृहात त्याप्रसंगी होती. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने 08 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताह समारोह 2023 साजरा करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाटयप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील अपूर्वा सोनार यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र या प्रयोगाच्या माध्यमातून सादर केले व त्यांचा तो सावित्रीबाईच्या जीवनातील एकेक प्रसंग पाहून सभागृहात उपस्थित सर्वच जण भारावून गेले आणि त्या काळची स्थिती सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहिली.
प्रारंभी संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मेणबत्ती प्रज्वलीत करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, सौ. अपूर्वा सोनार यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्यावतीने प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी अपूर्वा सोनार यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविकातून कार्यक्रमामागची भूमिका डॉ. संतोष बनसोड यांनी मांडली. संचालन अभिजित इंगळे यांनी, तर आभार निशिगंधा सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.