-स्मार्ट भ्रमणध्वनी दिसला अन् नियत फिरली
-गंगा कावेरी एक्सप्रेसने निघाली घराकडे
नागपूर :- आकाशवाणीत कंत्राटी नोकरी करणारी आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलेने चक्क 23 हजार रुपयांचा मोबाईल चोरला. लगेच मोबाईलचा सीम फेकला आणि दुसर्याच क्षणी मिळेल त्या गाडीने गावी निघाली. मात्र, गुन्हे शाखेच्या (लोहमार्ग) सतर्क पोलिसांनी शोध घेऊन महिलेला अटक केली. चांगला मोबाईल दिसला अन् नियत फिरली, असे अटकेतील महिलेने पोलिसांना सांगितले.
सविता (42), रा. बैतुल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. कला शाखेची पदवीधर असून सध्या ती आकाशवाणीत नोकरी करते. अलिकडेच पटत नसल्याने ती नवर्यापासून वेगळी राहते. ती नेहमीच नागपुरातील नातेवाईकांकडे येते. मंगळवारीसुद्धा ती नागपुरात आली. काम आटोपून बैतुलला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेली. तिकीट काढण्यासाठी ती आरक्षण तिकीट केंद्रात गेली. फिर्यादी आरती रहांगडाले (19), रा. गोंदिया या तरुणीचा मोबाईल चोरला आणि लगेच गंगा कावेरी एक्सप्रेसने बैतुलकडे निघाली.
इकडे आरतीने पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. मोबाईल चोरताना आरोपी दिसली. अधिक तपास केला असता ती गंगा कावेरी एक्सप्रेसने बैतुलसाठी निघाल्याचे स्पष्ट झाले. पथकाने लगेच महिलेचे छायाचित्र बैतुल लोहमार्ग पोलिसांना व्हॉट्सअॅपवर पाठविले. मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला उतरविले तसेच गुन्हे शाखेच्या पथकाला कळविले.
क्षणाचाही विलंब न करता गुन्हे शाखेचे महेंद्र मानकर, राहुल यावले, कीर्ती मिश्रा, नामदेव सहारे यांनी बैतुल गाठले. महिलेची सखोल चौकशी केली असता मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली तसेच मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तिला अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एपीआय चौधरी, महेंद्र मानकर, राहुल यावले, भूपेश धोंगडी, कीर्ती मिश्रा, नामदेव सहारे यांनी केली.