मनपाद्वारे दोन लाखावर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द

– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मनपा मुख्यालयात विशेष कक्ष स्थापित

नागपूर :- महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्वीकृती बाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. लाभार्थी महिलांनी भरलेल्या अर्जाच्या नमुन्याची तपासणी करून दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आठवड्याभरातच मनपाने हा दोन लाख अर्जांचा आकडा गाठला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या अर्जाची योग्य तपासणी व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील हे महत्वपूर्ण यश असून यासाठी मनपा आयुक्तांनी अर्जाच्या नमुन्याची तपासणी करणारे 280 पेक्षा अधिक संगणक मॅनेजर तसेच समाज विकास विभागाचे अधिकारी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मनपा आयुक्त यांच्या निर्देशनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापित करण्यात आले आहे. या कक्षामध्ये 100 पेक्षा अधिक संगणक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. यावर तीन शिफ्टमध्ये सुमारे 280 संगणक मॅनेजर नियुक्त करण्यात आले. या संगणक मॅनेजरकडून अर्जाची तपासणी करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. मनपाचे संगणक मॅनेजर या प्रक्रियेसाठी अहोरात्र काम करीत असून त्यांच्या परिश्रमामुळेच मनपाने महत्वाचा टप्पा गाठला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरिता राज्य सरकारकडून नेहमी आवाहन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज मनपाचे झोनल कार्यालय तसेच प्रभाग स्तरावरील जमा केले. अर्ज स्वीकार करून त्याची योग्य तपासणी करण्यासाठी मनपाद्वारे तीन शिफ्टमध्ये संगणक मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात 4 ठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आले व येथे देखील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचाच परिणाम मनपाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून 2,12,778 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले. मनपाला प्राप्त अर्जांमधून 181 अर्ज रद्द करण्यात आले. तसेच 5898 आंशिक रद्द करण्यात आले. केवळ 2589 अर्जाचा सध्या प्रक्रिया करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या महत्वपूर्ण टप्प्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे आणि तपासणी प्रक्रियेमध्ये सहभागी संगणक मॅनेजर आणि कर्मचारी या सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे. या सर्वांनी समन्वयाने केलेल्या कार्याचे मोठे फलीत मिळालेले आहे. शहरातील कुणीही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये. यासाठी मनपाद्वारे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लाभार्थी महिलांना स्वत: देखील ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. याशिवाय मनपातील झोनल कार्यालय तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑफलाईन आलेले अर्ज मनपाचे संगणक मॅनेजर ऑनलाईन माध्यमातून भरून घेतात. अर्ज तपासणीमध्ये ज्या अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसेल किंवा काही त्रुटी असेल तर ते तात्पुरते रद्द ठरविण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 असून मोठ्या संख्येत महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात हे कार्य पूर्ण झाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कमलेश झंझाड, स्वप्निल लोखंडे, प्रणय जयस्वाल, रवींद्र किदंर्ले, सिद्धार्थ झोडापे यांनी यामध्ये यशस्वी योगदान दिले.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ते नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधार कार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

विशेष म्हणजे, श्रावणबाळ,संजय गांधी निराधार तसेच इतर शासकीय आर्थिक योजना ज्या योजने-अंतर्गत रु. 1500 लाभ प्राप्त महिला सदर योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत तर त्याची नोंद महिलांनी घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी मनपाची शिबिरे

Thu Aug 8 , 2024
– नोंदणीसाठी कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक   – सुरु होणार फिरते नोंदणी केंद्र चंद्रपूर :- मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर मनपातर्फे नोंदणी शिबीरे आयोजीत करण्यात आली असुन यातील पहिले शिबीर ८ ऑगस्ट रोजी रामनगर येथील ज्येष्ठ नागरीक संघ येथे दुपारी ४ वाजता होणार असुन शिबिरात येणाऱ्या नागरीकांनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन मनपाने केले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com