यवतमाळ :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थेस यवतमाळ येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ९ वा ‘वंदन सन्मान’ यावर्षी अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंझ मोझरी येथे असलेल्या ‘सांझाग्राम’चे संचालक अमोल व जयश्री मानकर दाम्पत्यास जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
येत्या १३ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील महेश भवनमध्ये सकाळी ११ वाजता वंदन सन्मान सोहळा होणार आहे. अंबाजोगई येथील मानवलोक प्रतिष्ठानचे अनिकेत लोहिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, पमुख अतिथी म्हणून मन:शक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
समाजाला विचारांतून कृतीकडे नेणाऱ्या समर्पण प्रतिष्ठानद्वारे गेल्या २० वर्षांपासून ‘सांझाग्राम’मध्ये महिला सक्षमीकरण आणि पुनर्वसनाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. अमोल आणि जयश्री मानकर हे दाम्पत्य येथे समाजातील गरजू महिलांसाठी माहेर, कबीर, मातृऋण आदी उपक्रम राबवितात. माहेर उपक्रमांतर्गत पीडित महिलांच्या समस्याचे निराकरण करून त्यांना आधार दिला जातो. समुपदेशन, कायदेविषक मार्गदर्शन, पुनर्विवाहासाठी मदत, विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देवून महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले जाते. कबीर उपक्रमांतर्गत समाजातील विशेष मुलांची भोजन, निवासाची व्यवस्था करून कौशल्याधारित प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न होतो. मातृऋण उपक्रमांतर्गत ४५ वर्षांवरील अन्यायग्रस्त महिलांना सांझाग्राममध्ये कायमस्वरूपी निवारा, रोजगार दिला जातो. याशिवाय तरूणाईसाठीही येथे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तसेच पुरस्कार निवड समितीने राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कामांची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. त्यानंतर समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सांझाग्रामच्या अमोल व जयश्री मानकर यांची ‘वंदन सन्मान’ पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण साहेळ्यात इतरही सामाजिक संस्थांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.