अमरावती :- चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय जनता पार्टी तर्फे अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा एकविरेला साकडे घालत आज सकाळी महाआरती करण्यात आली. राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे, सहचारिणी डॉ.वसुधा बोंडे यांनी या महाआरतीला उपस्थित होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संपूर्ण शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग होऊ देण्याची प्रार्थना केली.
आज सायंकाळी इस्त्रोने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार चंद्रयान तीनच चंद्रावर लँडिंग होणार आहे. देशासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाचा क्षण असलेला हा प्रसंग यशस्वी व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संस्थांच्या कोषाध्यक्ष मीना पाठक, भारतीय जनता पक्षाचे नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रदेश प्रवक्त शिवराय कुलकर्णी, राजेश वानखडे, बाळासाहेब वानखडे, रवींद्र खांडेकर, मोहन जाजोदिया, श्रीराम नेह, मनीष कोरपे, सत्यजित राठोड, प्रणित सोनी, राहुल जाधव, चंद्रकांत बोंबरे, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता अंबा-एकवीरा देवीच्या मंदिरात महाआरती केली. चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी यावेळी आराधना करत माता अंबाएकविरा आईला साकडं घातलं.
प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात भारत चंद्राला गवसणी घालणार : डॉ.बोंडे
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं चंद्रयान तीन सायंकाळी चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. आपले शास्त्रज्ञ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे निश्चित यशस्वी होणार आहे. त्याकरिता शुभकामना देण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा-एकवीरा यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. अंबादेवीला साकडे घातले आहे. की आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाला यश येऊ दे. आज सायंकाळी चंद्रयान तीन चंद्रावर सुखरूपपणे उतरू दे. भारताचे नाव, भारत माता जगात सर्वश्रेष्ठ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होऊ दे. या चंद्रालाही गवसणी भारताला घालता आली पाहिजे. शास्त्रज्ञांचा प्रयत्न यशस्वी होण्याची मनोकामना आम्ही अंबादेवीच्या चरणी केल्याची माहिती यावेळी खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी माध्यमांना दिली.