नागपूर :- शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रास देतात .त्यामुळे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा होणे आवश्यक आहे . पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेळ मर्यादित निर्णय प्रक्रिया या गोष्टी युवकांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये लक्षात ठेवाव्यात असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या 70,000 पेक्षा नवीन उमेदवारांना दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे वितरणच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले .
देशभरात 44 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . नागपूरमध्ये धरमपेठच्या वनामती सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात शासकीय नोकरी मिळालेल्या उमेदवारांना संबोधित करतांना गडकरी बोलत होते. याप्रसंगी नागपूर आयकर विभागाच्या प्रमुख आयुक्त वसुंधरा सिन्हा, मुख्य आयुक्त आर. प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते .
जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून तुम्ही शासकीय सेवेत लोकांची सेवा करा नियमांचे पालन करा. गुणवत्तापूर्ण कामगिरीकडे लक्ष द्या , असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले .
केंद्र सरकारमध्ये लालफितीच्या जाळ्यात अडकलेल्या पदभरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विभागांनी युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे ठरवले असून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आता युवकांना शासकीय नोकऱ्या मिळत आहेत , असे गडकरींनी स्पष्ट केले .
नागपूरच्या रोजगार मेळाव्यात एकूण 133 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले असून यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ ,भारतीय रेल्वे ,भारतीय डाक विभाग , आयकर विभाग , भारतीय खाद्य निगम यासारख्या 13 विभागांचा समावेश होता .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्र वितरण करण्यात आले.