– होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप
नागपूर :- सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘परवडणारी घरे’ यासारखे प्रकल्प प्राधान्याने राबविणे आवश्यक असून त्यासाठी प्राधान्य, सवलत व सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर राहील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल- (नरेडको) यांच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार अभिजीत वंजारी, नरेडको अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन तिवारी, सचिव बादल माटे, कोषाध्यक्ष कुणाल पडोळे, सदस्य प्रियशील माटे, माजी आमदार सुधाकर कोहळे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, नोकरदार, लहान व्यावसायिक व कामगार वर्गाचा विचार करून त्यांच्यासाठी ‘परवडणारी घरे’ बांधण्याकरिता नरेडकोने पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येक शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे मास्टर प्लॅन तयार करण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
आमदार अभिजीत वंजारी यांनी नागपूरच्या विकासात नरेडकोने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची माहिती ढोकणे यांनी प्रास्ताविकेतून दिली तर उपस्थितांचे आभार तिवारी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी होमटाऊन प्रॉपर्टी एक्सपो मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विविध संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रॉपर्टी एक्स्पोत सहभागी संस्था, प्रदर्शनी बघण्यासाठी येणारे नागरिक उपस्थित होते.