जनतेच्या सहकार्यानेच नागपूरची चौफेर प्रगती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– झिंगाबाई टाकळी, भांडे प्लाट येथे जाहीरसभेचे आयोजन

नागपूर :- रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, उत्तम वैद्यकीय सोयीसुविधा, सांस्कृतिक वातावरण या माध्यमातून नागपूरची चौफेर प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे संपूर्ण श्रेय नागपूरकर जनतेला आहे. जनतेच्या सहकार्यानेच शहराचा कायापालट करणे शक्य होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (गुरूवार) केले.

पश्चिम नागपूर येथील झिंगाबाई टाकळी व दक्षिण नागपुरातील भांडे प्लॉट येथे ना. गडकरी यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, वॉर्ड अध्यक्ष अमर खोडे यांची उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘सर्वाधिक प्राधान्य मी रोजगार निर्मितीला देत आहे. उद्यमशील लोक तयार व्हावेत असा प्रयत्न आहे, जेणेकरून रोजगार वाढतील. शहर व जिल्ह्यातील १ लाख तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा निर्धार मी केला आहे. त्यासाठी अलीकडेच अॅडव्हान्टेज विदर्भ ही महापरिषद खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात आयोजित केली. यातून अनेक नव उद्योजकांना दिशा मिळाली. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. मिहानमध्ये 1 लाखावर तरुणांना आतापर्यंत नोकऱ्या मिळाल्या आहेत. यापुढे देखील मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होतील,’ असेही ना. गडकरी म्हणाले.

‘गेल्या दहा वर्षांपासून मी आपल्या आशीर्वादाने नागपूर लोकसभेचा खासदार आहे. या दहा वर्षांत एक लाख कोटींची कामे झाली. काही कामे राज्य सरकारच्या तर काही कामे राज्य सरकारच्या व महानगरपालिकेच्या सहकार्याने झालीत. झिंगाबाई टाकळी परिसरात गोधनी रेल्वे स्टेशनचा विस्तार झाला पाहिजे. ब्रॉड गेज मेट्रो सुरू झाल्यावर गोधनीच्या स्टेशनवरून थेट वर्धेला जाता आले पाहिजे, अशी व्यवस्था आपण करीत आहोत. नागपूर ते यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, वडसा, गोंदिया, अमरावती, छिंदवाडा आणि बैतूल अशी ही ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. या कामांमुळे जनतेला दिलासा मिळणार आहे,’ याचा ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. गोधनी परिसरात सिमेंट रोडसाठी ४८ कोटी रुपये केंद्रीय रस्ते निधीतून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात मंत्री असताना आपल्या भागातील रिंगरोड बांधण्याचे सौभाग्य मला मिळाले. आणि कॉंक्रिटीकरण करण्याचे काम मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर केले.

‘चोवीस तास पाणी देणारी देशातील एकमेव महानगरपालिका आहे. आज ८९ जलकुंभांचे काम हाती घेतले, त्यातील ७९ पूर्ण झाले असून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. आज ७० टक्के जनतेला चोवीस तास पाणी मिळत आहे. पण तीन महिन्यानंतर संपूर्ण नागपूरला चोवीस तास पाणी पुरवठा होईल,’ असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

*‘त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही’*

आपल्याकडे सांगण्यासारखी कामे नाहीत म्हणून जे लोक टीका करतात, त्यांना मला महत्त्व द्यायचे नाही. कारण ते निवडणूक आली की जातीवाद उकरून काढतात, संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका करतात. संविधान बदलण्याचा तर प्रश्नच नाही. जातीवादाला देखील आमच्याकडे स्थान नाही. दीक्षाभूमी, ताजबागचे काम करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिचोलीतील संग्रहालयाला निधी देताना आणि १ लाख १४ हजार लोकांना वैद्यकीय मदत करताना आम्ही जात-धर्म-पंथ बघितला नाही. मी जातीवादाचे राजकारण कधीही केले नाही, असेही ना. गडकरी म्हणाले.

*अनधिकृत ले-आऊट्समधील नागरिकांना दिलासा*

वीज, पाणी, रस्ते नसल्यामुळे अनधिकृत ले-आऊट्समध्ये गैरसोय होती. त्यामुळे या भागातील लोकांमध्येही असंतोष निर्माण झाला होता. आपण अनेक ले-आऊट्स नियमित केले. तिथे पाईपलाईन टाकली, रस्ते बांधले आणि वीज पुरवठा सुरू केला आणि नागरिकांना दिलासा दिला, असे ना. गडकरी यांनी दक्षिण नागपुरातील भांडे प्लॉट येथे आयोजित जाहीर सभेत सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान

Fri Apr 12 , 2024
– शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक गडचिरोली :- महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!