– राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
– स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार
नागपूर,दि,25: सर्वसमावेशक, सुलभ सहभाग लोकशाही बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. मतदान करुन लोकशाही मजबूत करु व देशाची प्रगती घडवू या, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी येथे केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार व राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, प्रगतिशिल शेतकरी मोहन हिरालाल, उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, ज्योती आमगे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
राजा राजघराण्यात जन्म घेत होता, आता मतदार राजा मतदानाने जन्म घेतो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान अस्तित्वात आले, त्यानंतर 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सार्वभौम राज्यात नागरिकाला मतदानाचे अधिकार देण्यात आले. त्यांना आपल्या समस्यासाठी व सुरळीत राज्य कारभार चालविण्यासाठी आपल्यातील एक प्रतिनिधी संसदेत पाठवावा लागतो. त्यासाठी मतदान हे महत्वाचे शस्त्र नागरिकांना बहाल करण्यात आले. या सजग नागरिकत्वातून लोकशाहीला नवी उभारी मिळते. संविधानमुळे नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्काचा उपयोग करतांना कर्तव्याची जाण ठेवणे आवश्यक आहे.
मजबूत सरकारसाठी मतदान करणे आवश्यक आहे. या आधारावरच मतदार सरकार बदलू शकतो. त्यासोबतच मतदान ओळखपत्राचे महत्व अन्यय आहे. यासाठी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धन्यवाद मानावे लागतील, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.
श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार मतदानाने आपल्याला दिले आहे. परंतु मतदानाची टक्केवारी घटत आहे. त्यासाठी मतदार जागृती करणे गरजचे आहे, असे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी मतदानाचे वय 21 वरुन 18 वर्ष केले आहे. मतदार दिवसाचा मुख्य उद्देश नवमतदारास मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेणे हा आहे. राजकीय पक्षांनी या प्रक्रीयेत सहभागी व्हावे, त्यामुळे लोकशाही मजूबत होण्यास फार मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हक्कासोबतच कर्तव्याची जाण ठेवा, या प्रक्रीयेत अनेकांचे अथक परिश्रम लाभले आहे. मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खातरजमा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पुनरिक्षण कार्यक्रमात ते पाहून घ्या. त्यासोबत मोबाईल ॲपवरसुध्दा ते पाहता येते. आता वर्षातून चारदा आपणास याप्रक्रीयेत सहभागी होता येणार आहे. अठरा वर्षावरील सर्व नागरिकांनी आपले नाव नोंदणी करुन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आर.विमला यांनी सांगितले.

शहरी भागापेक्षा नक्षलग्रस्त भागातील मतदानाचे प्रमाण जास्त आहे. तरुणवर्ग मतदान प्रक्रीयेत सहभाग टाळतो आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदार जागृती करणे आवश्यक असल्याचे लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी सांगितले. साक्षरांपेक्षा निरक्षरांचे प्रमाण जास्त आहे. नक्षलग्रस्त भागात असूनही तेथील नागरिक जीवाची पर्वा न करता मतदान प्रक्रीयेत सहभागी होतात, हाच आदर्श डोळयासमोर ठेवून शहरी नवमतदारांनी मतदान प्रक्रीयेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मोहन हिरालाल यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तद्नंतर प्रा.प्रियंका गणोरकर यांनी मतदार जागृतीपर पोवाडा सादर केला. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक शेषराव बडवाईक, बसंतकुमार चौरासिया, शेषराव मुरकुटे व महादेव कामडी यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक विषयक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर,उपजिल्हाधिकारी हेमा बढे, मुकबधीर विद्यालयाच्या प्राचार्य मिनल सांगोडे, चंद्रशेखर छत्रपाल यासोबत रेडक्रास सोसायटी सदस्य, मतदान केंद्राधिकारी, तसेच निवडणूक विषयक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन निलेश पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार राहुल सारंग यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.