शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई :- राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी कृषिमंत्री मुंडे म्हणाले, देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भविष्यात भारतातील ई-कॉमर्स 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

या ॲपद्वारे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करणार असल्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास द्विगुणित होईल असेही यावेळी कृषीमंत्री मुंडे म्हणाले.

यावेळी अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील , पोस्टमास्टर जनरल (बिझनेस डेव्हलपमेंट) अमिताभ सिंग, पोस्टमास्टर जनरल के सोमसुंदरम, मुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळे, श्रद्धा गोकर्ण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बहुपयोगी ॲप

अॅप अनावरणाच्या दिवशीच 358 उत्पादकांची 1370 उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ॲप असे डाउनलोड करावे

प्ले स्टोअर मध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड (लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.mart) करून फ्लिपकार्ट ॲमेझॉन याप्रमाणेच 1370 उत्पादने खरेदी करता येऊ शकतात. या ॲपवरऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल - राज्यपाल रमेश बैस

Fri Mar 8 , 2024
पालघर :-  आदिवासी भागात ‘प्रत्येक हाताला काम’ देण्याची आवश्यकता आहे. काम करताना सिंचनाची सोय म्हणजेच ‘प्रत्येक शेताला पाणी’ उपलब्ध करून दिले, तर मनरेगा मार्फत अधिक चांगले काम होऊ शकते.अनेक गावात मनरेगाअंतर्गत विविध कामे होत आहेत.मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विक्रमगड तालुक्यातील विकसित गाव खोमारपाडा येथील विकासकामांची पाहणी राज्यपाल बैस यांनी केली त्यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com