संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 15:- मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटामुळे सन समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर निर्बंध होते .गर्दी टाळण्यासाठी चार पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असल्याने होळी सारख्या रंगाचा उत्सवही निरुत्साहीपणे साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.शिथिल झालेल्या कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षांची मरगळ झटकून नागरिक होळी साजरी करण्याची तसेच धुलीवंदनाची नियोजन करीत आहेत.
होळी हा रंगाचा उत्सव असल्याने या सनाबाबत विशेष आकर्षण आहे.बाहेरगावी गेलेले अनेक नागरिक होळीच्या सणानिमित्त स्वतःच्या गावाला परततात परंतु मागील दोन वर्षे होळी साजरी करण्यावर निर्बंध होते तसेच संचारबंदी व जमावबंदी असल्याने नागरिकांना होळीचा सणाचा आनंद घेता आला नाही यावर्षी मात्र या दोन वर्षांची कसर काढत होळी साजरी करण्याचे वेगवेगळे नियोजन करण्यात आले असून शुक्रवारी बाजारात वेगवेगळे होळी साहित्याचे दुकाने सुसज्ज झाले आहेत .बाजारात रंगबिरंगी रंगानी बाजारपेठा सजल्या असून पिचकारी , गुलाल , रंग, मुखवटे विक्रीकरिता आले आहेत तर ग्राहकांनीही कंबर कसली आहे.
यावर्षी होलिका दहन 17 मार्च ला होणार आहे तर धुलिवंदन 18 मार्च ला होणार आहे.होळीचा दुसरा दिवस हा पाडव्याचा राहणार असून होळीच्या या पाडव्याला सकाळपासूनच गुलाल व रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण होणार आहे तर बचचे कंपनी रंगाच्या रंगात चांगलेच रंगणार असले तरी मांसाहार खयवय्ये साठी तसेच तळीरामासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाचा व धुमाकूळ चा असल्याने कित्येकच कोंबड्या बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार आहे तर काहींना या उत्सवाचा आनंद पनीर ची भाजी खाऊनच समाधान मानावे लागणार आहे.
पारंपरिक रितिरिवाजा नुसार 17मार्च ला होळी तर 18 मार्च ला धुलिवंदणाला सुरुवात होणार असून यादिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तळीरामाचा तसेच उत्साही तरुणाचा सर्वत्र कोलाहल दिसून येणार आहे तसेच दारूचा घोट व मासाहारावर ताव मारणाऱ्यांची संख्या वाढणार आहे त्यामुळे काही तळीरामानी गुप्त पद्धतीने दारूची सोय करून ठेवली असून होळीच्या पर्वावर मटण पार्टी चा आस्वाद तरुणाई घेताना दिसून येणार आहेत.