नागपूरकर अनुभवणार आनंदोत्सव
नागपूर, दि. 26 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात 27 मार्च रोजी क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारचा शो हा पहिल्यांदाच नागपूर शहरात होत असून हा ‘एरोमॉडेलिंग शो’ नागपूरकरांना संस्मरणीय ठरावा यासाठी उत्तम नियोजन करावे तसेच उन्हाची तीव्रता पाहता त्याठिकाणी पिण्याचे पाण्याची व इतर अनुषंगीक सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी संबंधित विभागाला आज दिले.
‘एरोमॉडेलिंग शो’ च्या आयोजनाच्या धर्तीवर मानकापूर स्टेडियमला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पूर्वतयारी व सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, एनसीसीचे अधिकारी कॅप्टन प्रवीण शर्मा यांच्यासह इतर अधिकारी व आयोजक मंडळी यावेळी उपस्थित होते.
