नागपूर :- नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बुधवार (ता.३) रोजी महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे आकस्मिक भेट देत तेथील कामाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन क्षेत्रातील घराघरातील वर्गीकृत कचरा संकलित करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागच्या डॉ श्वेता बॅनर्जी तसेच नगर रचना विभागाच्या उपसंचालक प्रमोद गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वतः डंपिंग यार्ड मध्ये येणाऱ्या कचरा गाडीचे निरीक्षण करीत त्यागाडीत बसून वजन काट्या वरून तर थेट भांडेवाडी येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली.
याशिवाय भांडेवाडी येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी निरीक्षण केली. भांडेवाडी येथे प्रकल्पामुळे तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन समतोल करण्यात येत असल्यामुळे कामाबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या SusBDe या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार करणाऱ्या या प्रकल्पाला गती देऊन ठराविक कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कामामध्ये कुठल्याही प्रकारची गुणवत्तेबाबत तडजोड केली जाऊ नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.