मुंबई :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस गाड्या घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महामंडळाच्या स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून यामुळे परिवहन विभागाचे 1700 कोटी रुपये वाचले आहेत. याबाबत एक महिन्याच्या आत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
याबाबत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रचलित पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची तीन समूहामध्ये विभागणी करून प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे सात वर्षासाठी 1310 बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभागांना केवळ एकत्रित निविदेनुसार तीन समूहात बस गाड्या पुरवण्यात येणार आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.