– विविध समस्यांचा घेतला आढावा
नागपूर :- हुडकेश्वर-नरसाळा येथे नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध विकास कामे सुरु आहेत. यातील अनेक कामे प्रलंबित असून या सर्व कामांना गती देउन तातडीने पूर्ण करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हुडकेश्वर-नरसाळा येथील विविध समस्यांचा शुक्रवारी (ता.१७) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. बैठकीत आमदार कृष्णा खोपडे, आमदार चरणसिंग ठाकुर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, गणेश राठोड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपसंचालक नगर रचना किरण राउत, सहायक संचालक ऋतुराज जाधव, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, माजी नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, भगवान मेंढे, माजी नगरसेविका विद्या मडावी, लीला हाथीबेड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर महानगरपालिकेला भेट दिल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पगुच्छ देउन त्यांचे स्वागत केले.
नागपूर शहरात पाणी पुरवठा होत असताना अनेक ठिकाणी पाण्याची गळतीमुळे आवश्यकता असलेल्या भागांमध्ये मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गळती देखील तातडीने थांबवावी. असे चंद्रशेखर बानकुळे यावेळी म्हणाले. बैठकीमध्ये हुडकेश्वर –नरसाळा निर्माणाधिन गडर लाईन संदर्भात, परिसरात कचरा उचलणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे व सोबतच सफाई कामगारांची संख्या वाढविणे, नव्याने होऊ घातलेल्या ले-आऊट मध्ये स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी, नाला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी, मालकी हक्काबाबत जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांच्याकडून इटीएस पद्धत सुरु करण्यासंदर्भात मागणी, हुडकेश्वर हद्दवाढ क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण करणे, सिमेंटचे रस्त्याच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावणे, दुबेनगरमध्ये असलेल्या बगिच्याचे दुरुस्तीकरण, हुडकेश्वर (खुर्द) ते किरणापूर गावापर्यंत आपली बस सुरु करणे, रुही-पेवठा –बनवारीला जाणारी आपली बससेवा गावातून जाणे, बर्डी ते न्यू नरसाळा या भागात बस फेऱ्या वाढवण्याची मागणीचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला.
हुडकेश्वर नरसाळा भागात गडर लाईन निर्माण कार्य सुरु आहे. या कामाच्या गतीबाबत श्री. बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी गटर लाईन टाकल्यानंतर रस्ते सुस्थितीत करणे तसेच ज्या भागात रस्ते तोडली जाणार आहेत त्याभागात पुढील सोयीसाठी पेव्हर ब्लॉक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरात नवीन रस्ते बनविताना विशिष्ट अंतरावर वेगवेगळ्या जोडण्यांकरिता पेव्हर ब्लॉक लावण्याचीही त्यांनी सूचना केली. स्वच्छतेसंदर्भात कार्य करताना झोन स्तरावरील स्वच्छता निरीक्षक व जमादार यांनी कामात सुलभता यावी व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कार्य करावे, असेही निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शहरातील सर्व बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीसंदर्भात तातडीने सर्वे करुन दुरुस्त करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. नाल्यांच्या सुरक्षा भिंतीसंदर्भात स्वतंत्र डीपीआर तयार करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. हुडकेश्वर-नरसाळा भागात ‘आपली बस’ सेवेच्या संदर्भात २० किमीचे मॅपिंग करुन त्याची मार्गनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
शहरात सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचाही त्यांनी आढावा घेतला. शहरातील बंद असलेल्या कॅमेऱ्यांकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. त्याकरिता बंद असलेल्या कॅमेऱ्यांच्या कारणासह माहितीचा अहवाल सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले. नाले सफाई बाबत त्यांनी शहर हद्दीच्या पुढेही नाल्यांची सफाई व्हावी याकरिता नागपूर सुधार प्रन्यास सोबत समन्वयाने काम करण्याबाबत निर्देशित केले. अतिक्रमण संदर्भात संपूर्ण शहरभरात सर्वे करुन रस्त्याच्या काठावर बसणारे मटण विक्रेते, इतर व्यवसायीकांवर कारवाई करणे तसेच अवैधपणे बांधण्यात आलेले सर्व अतिक्रमण तोडण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलिस प्रशासनासोबत सुरु असलेल्या कार्यवाहीत सातत्य ठेवून प्रभावीपणे कार्यवाही करण्याचेही निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.