वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अभिवाचन आणि कवितांची मैफिल

मुंबई :- माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने सोमवारी अभिवाचन आणि काव्य गायनाची मैफिल आयोजित करण्यात आली. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे हा कार्यक्रम झाला.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा जागर करणाऱ्या ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या शिवचरित्राचे यावेळी अभिवाचन करण्यात आले. अभिनेता विराजस कुलकर्णी, अभिनेत्री लतिका सावंत तसेच निवेदक मंदार खराडे यांनी यात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेतील काही लेखकांच्या साहित्याचे अभिवाचन आणि काही निवडक कवितांच्या ‘बोलतो मराठी’ या सुरेल मैफिलीचेही आयोजन करण्यात आले. यात अभिनेता सौरभ गोखले, अभिनेत्री मानसी जोशी, प्राजक्ता दातार, गायक श्रीरंग भावे आणि गौरी पंडित यांनी सहभाग घेतला.

अभिवाचनात श्रीमान योगी, वेध महामानवाचा मधील कांचनबारीच्या लढाईचा प्रसंग, गो.नी. दांडेकर यांच्या हे तो श्रींची इच्छा या कादंबरीतील शिवराज्याभिषेकातील प्रसंग आदींसह सदानंद रेगे, बहिणाबाई चौधरी, बा.भ.बोरकर, विं.दा. करंदीकर, गंगाधर गाडगीळ, ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, ना.धो. महानोर, आरती प्रभू आदींच्या साहित्य आणि कवितांचे वाचन आणि गायन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी माय मराठीचा प्रचार प्रसार होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगून वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुया गरवारे – धारप यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Oct 17 , 2023
मुंबई :- पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com