संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारीत ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन
कामठी :- कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढ्यातील अत्यंत निष्ठावंत ,निर्भीड ,निश्चयी ,नि:स्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातिप्राप्त असून ‘बिडी मजदूर चळवळ’व ‘आंबेडकरी चळवळ’ या दोन्ही आंदोलनातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वस्वी त्याग करून दलित,शोषित,वंचीत तसेच मजूर कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला.मात्र काळाने घेतलेल्या झडपीत ऍड दादासाहेब कुंभारे वयाच्या 59 व्या वर्षी कालवश झाले.त्यांच्या देहाला त्यांची लेक सुलेखा कुंभारे यांनी मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आणि मागील 42 वर्षांपासून दादासाहेब कुंभारे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक,शैक्षणिक,व धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.आणि ऍड सुलेखा कुंभारे यांच्या चळवळीला यशप्राप्त होत आहे तसेच कामठी शहरात निर्मित केलेल्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी शहराचे नाव जगाच्या नकाशात कोरल्या गेले आहे .एकंदरीत आपल्या वडिलांचा विचार ,चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपले जीवन या कार्याला समर्पित करणे हे एक मोठे अतुलनीय योगदान आहे.यासारखी अभिव्यक्ती क्वचितच आढळतात तसेच माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या कर्तृत्ववान कार्याला सलामी देत कर्तृत्ववान माणसालाही लाजवेल इतके महान,कर्तृत्ववान कार्य ऍड सुलेखा कुंभारे करीत असल्याचे मौलिक प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक निर्माता नागराज मंजुळे यांनी काल 23 मार्च रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात आयोजित कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोहात दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन करतेवेळी केले.
कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या कार्याचा नविन पिढीला ज्ञात व्हावे तसेच दादासाहेब कुंभारे यांना अभिप्रेत असलेल्या केलेल्या कार्यासह दादासाहेबांचे आदर्श कळावे यासाठी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त काल 23 मार्च ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात ‘कर्मवीर’ स्मरणिकेचे प्रकाशन सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक -निर्माता नागराज मंजुळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ उपसिका नलिनी कुंभारे तसेच ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार व पीआरपी चे संस्थापक अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे, प्रा.कमला गवई,रिपाईचे महासचिव व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गवई,रिपाई (खो)यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे, दिक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले,भदंत राहुल बोधी उपस्थित होते.याप्रसंगी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी प्रस्तुत करण्यात आली .त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जिवंनकार्यावर प्रकाश घालत समयोचित असे मौलिक मार्गदर्शन केले.तसेच शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 100 पेक्षा अधिक समाजसेवी संस्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे कालखंड साधून हरदास शैक्षणिक व संस्कृतीक संस्था व ओगावा सोसायटी व इतर सामाजिक संस्थेच्या वतीने 22 व 23 मार्च ला आयोजित दोन दिवसीय जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमाचे समापन करण्यात आले असून हा जन्मशताब्दी समारोह वर्षभर साजरा करण्यात येणार आहे दरम्यान 2023-24 या काळात अनेक शैक्षणिक,सामाजिक ,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले तर आभार अजय कदम यांनी मानले.कर्मवीर दादासाहेब जन्मशताब्दी महोत्सव यशस्वीतेसाठी ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था ,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ओगावा इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, जयभारत कामगार सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य बिडी उत्पादक मजदूर संघ,दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था,बहुजन रिपब्लिकन एकता मंच ,निर्धार महिला व बालविकास समिती यासह संस्थेचा सक्रिय सहभाग होता.