नागपूर :- पत्रकार विनोद देशमुख यांच्या “राजकारणातील फुटका आरसा” या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन पत्रकारांचे महागुरू मा. गो. वैद्य यांच्या अर्धपुतळ्याला पहिली छापिल प्रत अर्पण करून होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर रविवारी दुपारी करण्यात आले.
विदर्भातील नामवंत सूत्रसंचालक, वक्ते, लेखक प्रकाश एदलाबादकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. सिव्हिल लाईन मधील व्हीआयपी रोडवरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या (हैदराबाद हाऊस) प्रवेशद्वारालगत मागोंचा हा अर्धपुतळा नागपूर मेट्रो आणि मनपाने उभारला आहे. याच मार्गावर इतरही मान्यवरांचे पुतळे आहेत.
16 नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 याकाळात देशमुख यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या ‘आरसा’ या प्रासंगिक स्तंभातील 40 स्फुटं या 110 पानांच्या रंगीत पुस्तिकेत संकलित करण्यात आली आहेत. आडव्या पानांच्या या पुस्तिकेची मांडणी आशिष जोशी यांनी केली आहे.