– तीन हजार बांधवांनी घेतली धम्मदीक्षा
– जपानचे 20 उपासक आज घेणार श्रामणेर दीक्षा
नागपूर :-तामिलनाडू येथून एका भव्य वाहनात आलेला सम्राट अशोक यांचा पुतळ्याचे प्रतिक दीक्षाभूमी स्मारक समितीला सोपविण्यात आले. बुद्धिस्ट फॅटर्निटी मुव्हमेंटतर्फे तामिलनाडू येथून निघालेली रॅली रविवारी नागपुरात पोहोचली. रविवारी सायंकाळी दीक्षाभूमी येथील धम्मदीक्षा समारोहात पुतळ्याचे प्रतिक स्मारक समिती, दीक्षाभूमीला सोपविण्यात आले.
याप्रसंगी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समितीचे सदस्या कमल गवई, डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, समितीचे सदस्य, याशिवाय बुद्धिस्ट फॅटर्निटी मुव्हमेंटचे डॉ. भारती प्रभू, डॉ. प्रशांत इंगोले मुव्हमेंटचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सम्राट अशोकाचा अष्टधातूचा दहा फुट उंचीचा पुतळा तामिलनाडू येथे तयार करण्यात येत आहे. दोन वर्षात हा पुतळा तयार होईल. त्यानंतर दीक्षाभूमीला सोपविण्यात येईल.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमी 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी 9.30 वाजता भदंत ससाई यांच्या हस्ते झाले. मंचावर भदंत धम्मसारथी, नागवंश, प्रज्ञा बोधी, भीमा बोधी, नागसेन, महानामा, राहुल, धम्मविजय, कश्यप, भदंत धम्मप्रकाश, संघप्रिया, विशाखा गौतमी, पुंडलिक उपस्थित होते.
उद्घाटनानंतर भदंत ससाई यांनी उपस्थित बांधवांना दीक्षा दिली. प्रारंभी 50 अनुयायांना श्रामणेरची दीक्षा देण्यात आली. दिवससभर चाललेल्या धम्मदीक्षा कार्यक्रमात रात्रीपर्यंत तीन हजार उपासक उपासिकांनी दीक्षा घेतली, अशी माहिती भदंत ससाई यांनी दिली. धम्मदीक्षा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मसेनेचे पदाधिकारी आणि सदस्य सहकार्य करीत आहेत. सोमवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजेदरम्यान जपानचे 20 उपासक भदंत ससाई यांच्या हस्ते श्रामणेरची दीक्षा घेतील. या 20 उपासकांत महिला उपासिकांचाही समावेश आहे. थायलंडच्या भिक्खू संघातर्फे त्यांना भोजनादान दिले जाईल. तिसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी (24 ऑक्टोबर) दिवसभर धम्मदीक्षा सोहळा होईल. या तीन दिवसांत हजारो बांधव धम्मदीक्षा घेतील, असा विश्वास भदंत ससाई यांनी व्यक्त केला.