पारशिवनी :- तालुक्यातील मौजा नेऊरवाडा येथे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी आज सोमवारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला. ग्रामपंचायत नवेगाव खैरी अंतर्गत मौजा नेऊरवाडा येथील लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास असून येथे जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत जुनी पाणीपुरवठा योजना आहे. सदर योजनेची विहिर नदीकाठी असल्यामुळे ही विहिर ऑगस्ट २०२० च्या महापुरात पूर्ण बुडाली होती . त्यानंतरसुद्धा जुलै २०२२ पुरात बुडाली . त्यामुळे विहिरीत गाळमाती व वाळू साचली आहे. यामुळे विहिरीचे पाणी कमी तसेच दूषित झाले आहे. पाण्याचे झरेही बुजल्याने पाणीपुरवठा कमी व गढूळ होत असतो. यासंबंधी ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना लेखी माहिती दिली , परंतु त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे. मागील आठ दिवसांपासून सदर योजनेची विद्युत मोटर पंप नादुरुस्त असल्यामुळे गावात पाणीपुरवठा पूर्णतः बंद असून फक्त एकमेव हातपंप आहे . त्यामुळे गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून संबंधित सरपंच , सचिव व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून ग्रा.पं. प्रशासन दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचा बहाणा करीत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी करण्यात आला . अशावेळी हर घर नळ , हर घर जल अशी जलजीवन योजना शासन कशी राबविणार असा सवाल निर्माण करण्यात आला . तेव्हा सदर समस्येवर ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी तहसीलदार प्रशांत सांगडे व गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली . निवेदन देते वेळी ग्रा.पं. सदस्य फजित सहारे , सदस्या उमा तेलोते , वर्षा लांजेवार , जया राऊत , पंचफुला भिमटे , भोजराज दुदुके , सुनील सहारे , नंदू सहारे , मंगेश खडसे , सुनीता सहारे , सोनू दुदुके , ममता राऊत , पुष्पा कडू , वंदना राजूरकर आदींसह शंभरावर महिला , पुरुष उपस्थित होत .
पाणी समस्येवर येत्या सोमवार पर्यत दोन दिवसात उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही निवेदनातून देण्यात आला .