बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश

मुंबई :- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहल, जमाते उलेमाचे राज्याचे अध्यक्ष नदीम सिद्दीकी, विविध जिल्ह्यातून आलेले मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण सर्व सण उत्सव नेहमीच सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन साजरे करतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी त्याचप्रमाणे ईद मध्येही आपला गृह विभाग नियोजन करत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दरवर्षीप्रमाणेच गृह विभाग या सणासाठी नियोजन करेल, आवश्यक ती दक्षता घेईल. या सणापूर्वी तीन-चार दिवस आधी पशूंची वाहतूक सुरु होते. त्यामध्ये काही अनधिकृत घटक अडथळा आणत असतील तर त्याबाबत पोलीस दक्षता घेतील. यापुर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष दिले जाईल.

यावेळी मुस्लिम बांधवाच्या वतीने सिद्दीकी यांनी यंदा ईद व एकादशी एकाच दिवशी आल्याचे सांगून. मुस्लिम बांधवांनी अशा प्रकारे एकाच दिवशी आलेल्या अनेक सणांच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केल्याचे सांगितले. आमदार श्री. आझमी, आमदार श्री. शेख यांनी बाजार समित्यांबाहेर बकरी विक्रीस परवानगी दिल्याबद्दल व पशूवैद्यकीय तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलयुक्त शिवार अभियानाला प्राधान्य क्रमाने राबविण्यात यावे- उपविभागीय अधिकारी - शिवाजीराव पडोळे

Sat Jun 17 , 2023
काटोल :- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी व नागरिकांना पेयजल कृषी क्षेत्रात राज्यात पीकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, निसर्गाच्या लहरीपणामुळे अनिश्चित व खंडित पर्जन्यमान, यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या‌ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com