– रामचंद्रबाबा मठात अखंड हरिनाम जप
बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी रामचंद्र महाराज यांचे मठात वसंतपंचमी,२ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला असून शनिवारला महाराजांच्या प्रतिमेची बेला नगरीतून भव्य पालखी दिंडी यात्रा निघणार आहे. तेव्हा असंख्य भक्तांचा मेळा पहायला मिळेल. रविवार, ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प लक्ष्मणराव गुरुवार महाराज आळंदीकर यांचे गोपालकाल्याचे जाहीर कीर्तन त्यानंतरचे भव्य महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. असे सूत्रांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
बेला ही महाराजांची जन्मभूमी आहे.परमहंस रामचंद्र महाराजांवर अपारश्रद्धा असणारे हजारो निस्सीम भक्तगण बेला,लोणारा, बुटीबोरी, नागपूर, उमरेड, चिमूर,चंद्रपूर,वर्धा, अकोला, भंडारा, यवतमाळ,अमरावतीसह विदर्भात सर्वदूर आहे. ते विविध धार्मिक कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावत रामचंद्रबाबांची मूर्ती,समाधी व प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतात. बेला येथील वार्ड क्र.३ मधील महाराजांचे मठात वसंतपंचमीला सकाळी घटस्थापना करण्यात आली. पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक व आरती, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ व आरती आणि रात्रीला भजन, प्रवचन, कीर्तन नित्यनेमाने सुरू आहे. भागवत एकादशी शनिवारला सकाळी१० वाजता मठातून भव्य पालखी दिंडी यात्रा निघेल. ती गावातील मुख्य मार्गाने फिरेल. त्यामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन देवस्थानचे पदाधिकारी वसंतराव मुठाळ,दिलीप मुळे, देवराव नरड, अरुण बावणे विलास मुळे यादवराव मुठाळ, विलास कोटमकर, गजानन दौलतकर, भास्कर हेडाऊ, गजानन घोडाम, व सहकाऱ्यांनी केले आहे.
– शुक्रवारी भरणार आठवडी बाजार
दर शनिवारला बेला येथील आठवडी बाजार भरतो. परंतु, येत्या शनिवारला बालयोगी रामचंद्रबाबांची पालखी दिंडी यात्रा असल्यामुळे शनिवारला भरणारा बाजार शुक्रवारीच भरणार आहे. असे बेला ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.