एक परिवार एक पुष्पहार समिती समारोह संपन्न

डॉ.बाबासाहेबांच्या देशभरातील पुतळयांचा सम्मान व्हावा – भदन्त हर्षबोधी 

नागपूर :-‘एक परिवार एक पुष्पहार’ ही संकल्पना घेऊन बुद्धीस्ट अल्पसंख्यांक आणि धार्मिक भिक्षू संघाच्या वतीने ३६५ दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्याने संविधान चौक, नागपूर येथे एका भव्य समारोहाचे आयोजन रविवार दि. २८ मे, रोजी करण्यात आले होते. भदन्त शाक्यपूत्र सागर (भोपाल) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्र राज्याचे भूतपुर्व गृहमंत्री अनिल देशमुख, आर.बी.पुस्कर (मेरठ, उत्तरप्रदेश), माजी मंत्री रतनलाल अहिरवार, डॉ. जी.एस.गौतम (नवी दिल्ली), श्यौराज सिंह, संस्थापक /अध्यक्ष राजलोक पार्टी, उत्तरप्रदेश इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. पूरणचंद्र मेश्राम, माजी मंत्री रमेश बंग, प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, भैय्या खैरकर इत्यादी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरूषांचे पुतळे भरपूर प्रमाणात आहेत परंतु त्यांच्या जन्मदिनी व पुण्यतिथी व्यतिरिक्त इतर दिवशी त्या पुतळयांकडे कुणीही भटकत नाही व परिणामी पुतळा परिसरात हारतुऱ्यांचा कचरा व इतर साहित्य तसेच पडून राहते. म्हणूनच एक परिवार एक पुष्पहार’ या समितीची स्थापना करून भदन्त हर्षबोधी यांच्या नेतृत्वात वर्षभरापासून नागपूर येथील संविधान चौकात हा उपक्रम राबविण्यात आला व त्याचाच एक भाग म्हणून हा समारोप कार्यक्रम होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचार घराघरात पोहोचावे. प्रत्येक परिवाराने त्यांच्या परिसरातील पुतळयाजवळ जावुन बाबासाहेबांना पुष्पहार घालावे, परिसराची स्वच्छता ठेवावी. दर रविवारी मान्यवर वक्त्यांना बोलावुन महापुरूषांचे विचार समजुन घ्यावे, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून समाजात कार्य करावे, नविन पिढीला मार्गदर्शन करावे याच उदात्त हेतुने उपरोक्त अभियानाची सुरूवात करण्यात आली होती. त्या उपक्रमास ३६५ दिवस पूर्ण झाल्याचे निमित्याने या भव्य समारोहाचे आयोजन होते. भारत देशात वर्तमानातील शासन व्यवस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या भारतीय संविधानाची अवहेलना करीत असून संविधानाचा उद्देशच नष्ट केल्या जात आहे. संविधानाची धर्मनिरपेक्ष संकल्पना नाकारून धर्माच्या नावावर राष्ट्र निर्माण करण्याचा घाट घातल्या जात असून संविधानाची सर्व प्रतिके नष्ट केल्या जात आहेत. नागरिकांच्या जीवनात, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समानता आणण्याचा संविधानाचा उद्देश नाकारून प्रत्येक क्षेत्रात विषमता निर्माण केल्या जात असून अल्पसंख्यांक समाजाला भयभित केल्या जात आहे. देशात प्रत्येक क्षेत्र खाजगी संस्थेला देवून सरकारी विभागांना कमजोर केल्या जात असल्याची आलेल्या पाहुण्यांनी चिंता व्यक्त केली. ‘एक परिवार एक पुष्पहार’ हा नुसता पुजापाठ करण्याचा संकल्प नसून हे एक आंदोलन आहे. प्रत्येक गावात, राज्यात बाबासाहेबांच्या पुतळयाजवळ एकत्र यावे, त्यांचे विचार जाणावे व भारतीय संविधानाची रक्षा करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन या निमित्याने भदन्त हर्षबोधी यांनी केले. तसेच या समारोह समापनावेळी कुंदन नितनवरे, सुरेश मेश्राम, उषा नवनागे आणि देवेंद्र घरडे यांचा माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रमिला टेंभेकर, ज्योती बेले, सूमन कानेकर, सुषमा नगराळे, चारूलता कांबळे, विनोद दारूडे, त्रिवेणी पाटील, दमयंती रामटेके व समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषी नगर वाशियांच्या समस्या लोकप्रिय आमदार विकास ठाकरे यांच्या दरबारी

Wed May 31 , 2023
आमदार विकास ठाकरे यांना निवेदन देताणा संजय सोलव, अनिल पारखी कृषि नगरवाशी दाभा :-कृषि नगर दाभा येथील बऱ्याच वर्षापासून समस्या प्रलंबित आहे .आमदार विकास ठाकरे यांच्या निदर्शनात आणून दिले कृषी नगर येथील रोड खूप खराब झाले आहे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.आणि गडर लाईन चे काम झाले नाही सांडपाणी हे लेआऊट लागूनच बाजूने वाहत असते बराच मच्छर चा त्रास होतो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com