नागपूर, ता. १९ : उन्हाळ्यातील पाणी टंचाई व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध पंप जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी (ता. १९) नेहरूनगर झोन अंतर्गत नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्र. १, २ व ३ या भागातील ११ टिल्लू पंप जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी टिल्लू पंप जप्तीचे आदेश विभागाला दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक नागरिक अवैधरित्या नळाला टिल्लू पंप लावून पाण्याची चोरी करीत असतात. यावर आळा घालण्यासाठी मनपाद्वारे टिल्लू पंप जप्तीची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सदर कारवाई सकाळी ८ वाजता नेहरूनगर झोनच्या पथकाद्वारे करण्यात आली.