मुंबई :- समग्र शिक्षा अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणार का, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, समग्र शिक्षा अभियानात एकूण १६ हजार १०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८२६९ कर्मचारी कार्यरत आहेत. २९८४ कर्मचाऱ्यांची समायोजन तपासणी प्रक्रिया प्रगतीपथावर असून ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार १४ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.
शासन सेवेत कायम करण्यासाठी उपोषणास बसलेल्या इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी, अशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केली, त्यास अनुसरून त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.