यवतमाळ :- भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्टर जनरलच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शन महापेक्स -२०२५ दि.२२ ते २५ जानेवारी दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या ई-बायसिकल यात्रेचे यवतमाळात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रदर्शनाच्या जनजागृतीसाठी सेवाग्राम एक्सप्रेस आणि रायगड एक्सप्रेस या नावाने डाक विभागाच्या दोन ई-बायसिकल चमू राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करीत आहे. यापैकी सेवाग्राम एक्सप्रेसच्या दौऱ्याची सुरुवात सेवाग्राम, वर्धा येथून आली. नागपुर डाकसेवा विभागाच्या निदेशक डॉ. वसुंधरा गुल्हाणे यांनी हिरवी झेंडी दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेतील चमूचे जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
सेवाग्राम येथून निघालेल्या या चमूचे कळंब येथे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी कळंब उपडाकघराचे कर्मचारी सायकलसह या रॅलीत सहभागी झाले. यावेळी जिल्ह्याची परंपरा असलेले आदिवासी कला-नृत्य पथक या रॅलीत सहभागी होते. त्यानंतर ही रॅली श्री चिंतामणी मंदिर कळंब येथे आयोजित डाक चौपाल या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित झाली. यावेळी उपस्थित नागरिकांना या उपक्रमाबाबत तसेच डाक विभागाच्या विविध योजना आणि एक पेड माँ के नाम तसेच स्वच्छता संदेश याबाबत माहिती देण्यात आली.
यानंतर या चमूने चापर्डा येथील ध्यानभूमी येथे भेट देऊन उपक्रमाबाबत जनजागृती केली. यानंतर ही चमू यवतमाळ येथे दाखल झाली. येथील मुख्य डाकघर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डाक कर्मचारी व अधिकारी सायकलसह या रॅलीत सहभागी झाले. या वेळी बंजारा वेशभूषेतील कलावंतानी त्यांचे पारंपारिक स्वागत केले. या वेळी आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आयुर्वेदाचे महत्व या विषयावर विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
यानंतर या चमूने आर्णी येथील बाबा कंबलपोश दरगाह येथे भेट दिली व तेथे आयोजित कार्यक्रमातून डाक विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. तेथून ही सायकल यात्रा माहूरगड करिता रवाना झाली. जिल्ह्यामध्ये या सायकल रॅलीचे स्वागत विविध ठिकाणी डाक चौपाल कार्यक्रम आयोजित करून करण्यात आले आणि उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना डाक विभागाच्या विविध योजना, उपक्रम व स्वच्छता संदेश, एक पेड माँ के नाम व महापेक्स -२०२५ उपक्रमाची माहिती दिली, असे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.