– तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन
– डोंगरगाव येथे क्रीडासंकुल उभारण्यात येणार
काटोल :- विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असायला हवी तेव्हाच तो यशोशिखर गाठू शकेल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळातही तो पारंगत असायला हवा. जिल्हा परिषदेच्या शाळेत बऱ्याच ठिकाणी मैदान नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या सरावासाठी लवकरच डोंगरगाव येथे २५ एकर परिसरात ७५ कोटी रुपयाचे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. शिक्षकांनी आधुनिक युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतः बदलत रहावे असे प्रतिपादन काटोल नरखेड क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी श्री. गोविंदराव उमप हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येनवा येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ‘उद्घाटक ‘ म्हणून केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार चरणसिंग ठाकूर तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती संजय डांगोरे प्रमुख अतिथी जि.प.सदस्य समीर उमप, उपसभापती निशिकांत नागमोते, कृषीमित्र दिनेश ठाकरे, येनवा सरपंच ललिता ठाकरे, उपसरपंच हेमराज उमप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमराज सातपुते, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार जनबंधू, शिक्षण विस्तार अधिकारी जावेद इकबाल, प्राचार्य संदीप बोरकर, प्रवीण उमप, पराग महंत, विनोद चौरे, उमेश बंदे, किशोर गाढवे, सतीश रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात ५०० विद्यार्थी सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो,लंगडी, रिले रेस, लांब उडी, उंच उडी, दौड, कुस्ती, बुद्धिबळ तसेच सांस्कृतिक प्रकारात समुहनृत्य, समूहगीत, नक्कल, वकृत्व स्पर्धा इत्यादी प्रकार असणार आहे.
अध्यक्षीय भाषणात सभापती संजय डांगोरे म्हणाले की, माझ्या काटोल तालुक्यातील शिक्षक हे संघर्षातून पुढे आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी सदा तत्पर असतात.शाळेत कुठलीही समस्या आल्यास त्या समस्येवर मात करण्यात त्यांचा हातखंडा आहे. माझ्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पाठीशी पंचायत समिती, काटोल नेहमीच राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार जनबंधू , संचालन सतीश ढबाले व प्रियंका जंगले तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी जावेद इकबाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केंद्रप्रमुख राजू धवड, केंद्रप्रमुख पांडुरंग भिंगारे, केंद्रप्रमुख सुरेंद्र कोल्हे, केंद्रप्रमुख महेश राकेश, केंद्रप्रमुख निळकंठ लोहकरे यांनी तसेच श्री.गोविंदराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येनवा येथील व जि.प.शिक्षकवृंदानी अथक परिश्रम घेतले.