नागपूर :- प्रहार मिलिटरी शाळेत, रवी नगर येथे 16 डिसेंबर रोजी विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1971च्या भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक विजयानिमित्त, हा दिवस शौर्य आणि देशभक्तीच्या भावनेने प्रेरित करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या विशेष कार्यक्रमात यंदा विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल महेश प्रभाकर देशपांडे (निवृत्त),सुभेदार मेजर हेमराज खापरीकर,ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे, संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत पूजन करण्यात आले. तसेच अमरजवान ला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे रोप व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.आपल्या प्रेरणादायी भाषणात 1971च्या युद्धातील वीरगाथा सांगितल्या आणि विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठेची शिकवण दिली. त्याचबरोबर त्यांनी दहावीनंतर पुढे काय आणि एन.डी.ए बद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीताचे गायन विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये आलेल्या प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक करत क्रीडा आणि शिक्षण यांचा समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गाण्यांमुळे उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना जागृत झाली.कार्यक्रमाच्या समारोपाला शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी 1971च्या युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि देशसेवेची प्रतिज्ञा घेतली. विजय दिवसाचा हा उत्सव शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केवळ देशभक्तीची प्रेरणा नव्हे, तर त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ म्हणून सन्मान मिळाल्याचा अभिमानाचा क्षण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका विशालाक्षी पैदीपती यांनी केले. तसेच वंदेमातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.