Ø हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात
Ø विधानभवन, हैद्राबाद हाऊस, रविभवन येथील व्यवस्थेची पाहणी
Ø अधिवेशनासंदर्भात संपूर्ण माहिती ॲपवर उपलब्ध
Ø व्यवस्थेमध्ये तृटी राहणार नाही, याची खबरदारी घ्या
नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरु होत आहे. अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसेच विधानभवन परिसरात प्रशासनातर्फे करावयाच्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.
बिदरी यांनी विधानभवन, हैद्राबाद हाऊस तसेच रविभवन येथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध यंत्रणांनी समन्वय ठेवून 12 डिसेंबर पर्यंत संपूर्ण व्यवस्था पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे तसेच या परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष अधिकारी पजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये, विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता मानकर, शाखा अभियंता संदीप चापले, रवीभवनचे राहुल ठाकुर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानपरिषद व विधानसभेच्या सभागृहात करण्यात आलेली आसन व्यवस्था, नव्याने बसविण्यात आलेली मल्टीमिडीया कॉन्फरन्स सिस्टीमची पाहणी, पक्ष कार्यालय, भोजनगृह आदी व्यवस्थेसोबत परिसराची पाहणी करतांना बिदरी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. विधानभवन, आमदार निवास तसेच रविभवन परिसरात तीन हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार आहेत. या कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, मुख्य सचिव यांचे कार्यालय तसेच विविध मंत्रालयीन विभागांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यालयांमध्ये बैठक व्यवस्थेसह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रवीभवन येथील सभापती, अध्यक्ष, उपसभापती, विरोधी पक्षनेते यांची निवासस्थान तसेच या परिसरातील मंत्र्यांची निवासस्थाने व कार्यालयांसाठी प्रशानासतर्फे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली.
अधिवेशना संदर्भातील व्यवस्थेची माहिती ॲपवर
विधिमंडळ अधिवेशना निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सर्व सुविधांसदर्भात माहिती ॲपवर उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन व विमानतळावर हेल्पडेस्क तयार करुन बाहेरुन येणाऱ्या सदस्यांना तसेच अभ्यागतांना व्यवस्थेसंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसात संपूर्ण व्यवस्थेला अंतिम रूप दिल्या जाईल त्यादृष्टिने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेंसदर्भात माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात माहिती क्युआर कोडद्वारा उपलब्ध राहणार आहे. गुगल मॅपवर स्थळदर्शन नकाशा तयार करण्यात आला असून बाहेरुन येणारे अभ्यागत तसेच वाहन चालकांनाही क्युआर कोडद्वारा संपुर्ण माहिती मिळणार आहे. व्यवस्थेसंदर्भात येणाऱ्या त्रुटी व अडचणीची तक्रार सुध्दा क्युआर कोडद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.