– विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आयुक्तांचे मनमोकळे उत्तर
नागपूर :- पाणी, स्वच्छता, रस्ते, फुटपाथ, पथदिवे, वाहतूक, मलजलवाहिनी, आरोग्य अशा अनेक सुविधा पुरवून प्रत्येक नागपूरकराला दिलासा देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेला ‘थँक यू एनएमसी’ म्हणत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी हितगुज साधली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेपोटी आयुक्तांना अनेक प्रश्न विचारलीत ज्याची उत्तरे देऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले.
बिग एफएम च्या ‘थँक यू’ अभियानांतर्गत बुधवारी (ता.२७) सेंट्रल प्रोव्हिंसीएल स्कूलच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली व मनपाच्या कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येत असलेल्या दैनंदिन कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मनपा आयुक्त सभाकक्षामध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त विजय देशमुख, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, बिग एफएम च्या आर जे निशा, सेंट्रल प्रोव्हिंसीएल स्कूलच्या शिक्षिका सुषमा कानडे आणि पायल झाडे उपस्थित होते.
सकाळी घरापुढे येणारी कचरा गाडी आपल्या घरातील कचरा घेऊन जाते, गडर लाईनची समस्या आली तर मनपा ती दूर करते, आरोग्याच्या समस्यांबाबत मनपा सेवा देते अशा अनेक सुविधा मनपा शहरात प्रदान करते. आपले दैनंदिन जीवन मनपाच्या सुविधांनी व्यापलेले आहे. अशा मनपाप्रति आभार मानण्यासाठी बिग एफएम च्या ‘थँक यू’ अभियानाच्या माध्यमातून सेंट्रल प्रोव्हिंसीएल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनपाला भेट देऊन आयुक्तांचे आभार मानले व सर्व कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, महानगरपालिका म्हणजे काय, त्यातील प्रशासकीय रचना तसेच लोकनियुक्त प्रतिनिधी व त्यांची रचना, महानगरपालिकेची कार्य काय आहेत, महानगरपालिका कोणत्या सेवा पुरविते या सर्व बाबी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. उत्सुकतेपोटी विद्यार्थ्यांनीही डॉ. अभिजीत चौधरी यांना मनपा आयुक्त कसे बनायचे हा प्रश्न केला. यावर आयुक्तांनी विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अभ्यास कसा करायचा, सोशल मीडियाचा दुरूपयोग कसा टाळायचे या सर्वांविषयी जागरूक केले. शहर स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते हे देखील आयुक्तांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. घरातून कचरा गाडीमध्ये दिला जाणारा कचरा हा ओला आणि सुका असा वेगवेगळा संकलीत करूनच दिला जावा, यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुणी घाण करताना दिसल्यास त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. ज्यामुळे उद्याचे शहराचे नागरिक म्हणून आपले भवितव्य सुरळीत राहिल, असे देखील आयुक्तांनी सांगितले.
उपायुक्त विजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्य विषद केले. घरातून संकलीत करण्यात येणाऱ्या कचऱ्याचे पुढे काय होते, या प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांनी ओला, सुका, सॅनिटरी कचरा, घातक, सी अँड डी कचरा अशा कचऱ्याच्या विविध वर्गीकरणाबाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आपल्या शाळेतील परिसर प्लास्टिक फ्री व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी ‘इको ब्रिक्स’ तयार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी ‘इको ब्रिक्स’ कशा तयार करायचे हे देखील सांगितले. तयार केलेल्या ‘इको ब्रिक्स’ मनपाकडे आणून दिल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची ‘सीओसी’ ला भेट
विद्यार्थ्यांनी मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) येथे सुद्धा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना घरातून कचरा संकलीत करणारे वाहन, आपली बस, फायर स्टेशन यांचे लाईव्ह अपटेडची माहिती देण्यात आली. शहरातील विविध सिग्नलवर लावण्यात आलेल्या ३६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरांमुळे शहरावर देखरेख ठेवली जात आहे. या कॅमेरांच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नजर ठेवणे, विना हेलमेट, खूप जास्त वेग आणि निष्काळजीपणामुळे होणारे अपघात या सर्वांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.